
नगर शहरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे अडीच हजारांवर खुल्या जागा असून त्यावर अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत. तर काही जागा विकल्याही गेल्या आहेत. वीटभट्टय़ांपासून अनेक व्यवसाय यावर सुरू आहेत, असा घणाघाती आरोप मनपातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी बुधवारी मनपाच्या महासभेत केला. मनपाच्या नगररचना विभागाने आठ दिवसांत मनपाच्या मालकीच्या खुल्या जागांची यादी दिली तर कोणत्या जागेवर कोणाचे अतिक्रमण आहे, याचा पर्दाफाश करतो, असे थेट आव्हानच त्यांनी महासभेत दिले.
महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची महासभा ऑनलाइन बुधवारी झाली. मात्र, काही नगरसेवक या सभेला उपस्थित होते. आयुक्त शंकर गोरे, शहर अभियंता सुरेश इथापे, उपमहापौर गणेश भोसले, नगरसचिव एस. बी. तडवी यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत सभागृहनेते अशोक बडे, नगरसेवक सचिन शिंदे, कुमार वाकळे, बाबासाहेब वाकळे, आसिफसुलतान, पुष्पा बोरुडे तसेच ऑनलाइनद्वारे दीपाली बारस्कर आदींनी भाग घेतला.
तारकपूर रस्त्यावरील साईदीप हॉस्पिटलजवळील मनपाच्या मालकीची खुली जागा सिंध हिंद सेवामंडल चॅरिटेबल ट्रस्टला देण्याच्या विषयावरून मनपाच्या मालकीच्या शहरातील खुल्या जागांचा विषय चर्चेत आला. त्यावरून नगरसेवक अनिल शिंदे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मनपाच्या मालकीच्या सुमारे अडीच हजारांवर खुल्या जागा आहेत. यापैकी 1200 जागांची मालकी मनपाच्या नावे झाली आहे. अजून 1300 जागांवर मनपाची मालकी लावण्याची
प्रक्रिया सुरू असल्याचे नगररचना विभागाचे सहायक संचालक राम चारठाणकर यांनी सांगितले. तर हद्दवाढ झाल्यानंतर मनपा क्षेत्रात आलेल्या नव्या भागातील या खुल्या जागांची नोंदच मनपाकडे नसल्याचे वास्तवही त्यांनी मांडले. मात्र, आता त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
या विषयावर महासभेत सुरू असलेल्या चर्चेत नगरसेवक शिंदे यांनी आक्रमक भूमिका मांडली. मनपाच्या मालकीच्या व चांगल्या लोकेशनच्या जागा फुटाण्यासारख्या वाटल्या आहेत. मात्र, या जागांवर मनपाने स्वखर्चाने गाळे बांधून त्यांची विक्री केल्यास मनपाला उत्पन्नाचे चांगले साधन होईल. मनपाच्या मालकीच्या अडीच हजारांवर खुल्या जागांची यादी मला द्या. या जागांपैकी कोठे वीटभट्टय़ा झाल्या आहेत व कोठे अन्य व्यवसायांची अतिक्रमणे झाली आहेत, याची माहिती मी मनपाचे अधिकारी व पदाधिकाऱयांना त्या जागांवर नेऊन दाखवतो, असे आव्हान शिंदे यांनी सभागृहात दिले. त्यावर येत्या 8 दिवसांत या जागांची माहिती शिंदे यांना दिली जाईल, असे नगररचनाचे चारठणकर यांनी स्पष्ट केले.
चार महापुरुषांचे पुतळे लवकरच होणार
सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज, मनपा मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, माळीवाडय़ात महात्मा ज्योतिबा फुले आणि जुन्या बसस्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे राष्ट्रीय महापुरुषांचे चार पुतळे उभारण्याचा विषय चर्चेला आल्यावर नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रशासनावर टीकेचा भडीमार केला. तीन वर्षांपासून हा विषय येत आहे. वेळोवेळी मंजूर करूनही पुतळे उभारले जात नाहीत. त्यामुळे महिनाभरात ते पुतळे उभारले गेले नाही, तर आम्ही ते उभारू, असा इशारा त्यांनी दिला. मात्र, जिल्हास्तरीय पुतळा समितीने मागील वर्षभरातील पुतळे उभारणीचा ठराव आवश्यक असल्याचे सांगितल्याने हे विषय महासभेत पुन्हा मंजुरीसाठी घेतले आहेत, असे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले. उपमहापौर गणेश भोसले यांनीही या ठरावानंतर लवकरात लवकर चारही पुतळे उभारण्याची ग्वाही दिली.


























































