एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची सरकार हमी देईल का? शिवसेनेचा सवाल

शेतकरीहिताचे ढोल वाजवत केंद्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित दोन विधेयके आणली आहेत. मात्र ही विधेयके मंजूर झाल्यानंतर देशातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची सरकार हमी देईल काय? या विधेयकांमुळे शेतकऱ्य़ांचे उत्पन्न दुप्पट होईल काय? असा सवाल करत शिवसेनेने रविवारी राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कृषी विधेयकांसंदर्भात विरोधक हे जनतेत व शेतकऱ्य़ांमध्ये गैरसमज व अफवा पसरवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. मग हरसिमरत कौर यांनी अफवा ऐकूनच राजीनामा दिला काय? असा टोलाही शिवसेनेने लगावला.

शिवसेनेने शेतकरीहिताची स्पष्ट भूमिका मांडत मोदी सरकारच्या शेतकऱ्य़ांबाबतच्या संदिग्ध भूमिकेची चिरफाड केली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या विधेयकांवर भूमिका मांडत ही दोन्ही विधेयके मंजूर झाल्यानंतर देशातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी केंद्र सरकार घेईल का? असा सवाल उपस्थित केला. त्याच वेळी या विधेयकांनंतर शेतकऱ्य़ांचे उत्पन्न दुप्पट होईल काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतकरी हिताच्या विधेयकांबद्दल जनतेत अफवा पसरवल्या जात आहेत असे पंतप्रधानच म्हणाले आहेत. मग त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी या अफवा ऐकूनच मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे काय? असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी लगावला.

लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देश ठप्प असताना शेतकरी अहोरात्र काम करत होता. शेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्य़ांच्या संवेदनशील विषयावर संसदेचे विशेष अधिवेशन सरकारने बोलवावे आणि या विधेयकांवर सविस्तर चर्चा करावी अशी मागणीही राऊत यांनी केली. या विधेयकांना शेतकऱ्य़ांचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे, मात्र संपूर्ण देशात या विधेयकांना विरोध होताना दिसत नाही. याचाच अर्थ या विधेयकांबद्दल शेतकरी व जनतेच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. सरकारने हे गैरसमज विशेष अधिवेशन बोलावून दूर करावेत अशी सूचनाही राऊत यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या