वंदे मातरम्, जन गण मन देशभरात गायले जावे;शिवसेनेची विधान परिषदेत शिफारस करणारी मागणी  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ात प्रत्येकाचा जीवनमंत्र झालेल्या, प्रत्येकाला स्फूर्ती देणाऱया, स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा देणाऱया ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ ही प्रेरणादायी गीते देशभरात गायली जावीत यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी शिफारस करणारी मागणी शिवसेनेने आज विधान परिषदेत केली.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ात ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ या गीतांमुळे लाखो लोक स्वातंत्र्यलढय़ाकडे ओढले गेले. अनेक स्वातंत्र्यसैनिक वंदे मातरम् म्हणत फासावर चढले. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर क्रांतिकारकांना आणि भारतमातेला वंदन करण्यासाठी लोकसभा, राज्यसभा तसेच राज्याच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वंदे मातरम्ने अधिवेशनाची सुरुवात होते तर समारोप जन गण मन या गीताने होते.

त्याच धर्तीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदे मातरम् हे गीत तर समारोपाला जन गण मन हे गीत गायले जावे याबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा तसेच सर्व राज्य सरकारांना यासंदर्भात आदेश द्यावेत. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत, अशी शिफारस शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत अशासकीय ठराव मांडून केली. दरम्यान, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही क्रांतिगीते असून नवीन पिढीला ती जरूर कळली पाहिजेत, मार्गदर्शक ठरली पाहिजेत. त्यासाठी राज्य सरकार योग्य ती कार्यवाही करेल, असे सांगत हा प्रस्ताव मागे घेण्यास सांगितला. त्यानुसार बहुमताने हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.