शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर विमा कंपन्यांची कार्यालये उभारा, शिवसेनेची पंतप्रधानांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा उद्देश शेतकऱयांच्या भल्याचा असला तरीही या योजनेद्वारे विमा कंपन्या शेतकऱयांचे हित धाब्यावर बसवून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. ग्रामीण भागात पीक विमा कंपन्यांची कार्यालयेच नसतात. असे असताना शेतकऱयांना ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले जाते. मात्र गावपातळीवर अनेक शेतकरी संगणक साक्षर नसतात. त्यात अनेक गावांमध्ये वीज नसल्यामुळे ते पीक विम्यापासून वंचित राहतात. हे लक्षात घेऊन तालुका स्तरावर विमा कंपन्यांची कार्यालये स्थापन करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली.

पीक विमा योजनेत शेतकऱयांची लुटमार होत असून पीक विमा कंपन्यांकडे तब्बल 473 कोटी रुपये पडून आहेत. या कंपन्यांच्या विरोधात शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच मुंबईत मोर्चाही काढला होता ही बाबही शिष्टमंडळाने पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिली. मुळात पीक विमा ठरविण्याचे निकषच सदोष असून त्यात सुसूत्रता आणणे गरजेचे असल्याचेही शिष्टमंडळाने पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले. सरकारची आणेवारीची पद्धती सदोष असून पाच ते सात वर्षांत ज्या वर्षी जास्त उत्पादन झाले त्या वर्षाच्या निकषावर पीक विमा ठरविला जावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार संजय राऊत आणि लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या संसदेतील कार्यालयात भेट घेऊन विमा कंपन्यांकडून शेतकऱयांच्या होत असलेल्या पिळवणुकीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले. शिष्टमंडळात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, धैर्यशील माने, राजन विचारे, राजेंद्र गावीत, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे तसेच आमदार जयप्रकाश मुंदडा आणि सुभाष साबणे यांचा समावेश होता.

– शिवलिंग शिवाचार्य महाराजांना ‘पद्म’ पुरस्कार द्या
शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे लिंगायत समाजातील स्थान मोठे आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या आणि वय वर्षे 103 असलेल्या शिवाचार्य महाराजांनी देशाच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूज्य गोळवलकर गुरुजींसोबतही त्यांनी काम केले असून देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातही त्यांचे योगदान आहे. मूळचे मराठवाडय़ातील अहमदपूरचे असलेल्या शिवाचार्य महाराजांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणीही शिष्टमंडळाने पंतप्रधानांकडे केली.

– कर्ज देणाऱ्या बँकांना ताळ्यावर आणा
पीक विम्यातील जोखमीची टक्केवारी 70 वरून 90 टक्क्यांवर न्यावी या मागणीसह शेतकऱयांना कर्जवाटप करणाऱया बँकांनाही ताळय़ावर आणा, अशी आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली. शेतकऱयांना कर्जवाटप करा, अन्यथा कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला असतानाही अनेक राष्ट्रीयीकृत बँका तसेच काही सहकारी बँका या आदेशाला केराची टोपली दाखवतात. त्यामुळे या बँकांनाही विमा कंपन्यांसोबतच ताळय़ावर आणण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावर संबंधित विमा कंपन्यांना योग्य ते निर्देश दिले जातील, असे आश्वासन पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला दिले.