शिवसेने मध्येच सर्वांना न्याय मिळतो – शिवसेना उपनेते अनिल राठोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर 

‘खासदार म्हणतात विकास, आमदार म्हणतात विकास, विकास करणारी हि मंडळी कोण ? विकास करण्यासाठी पैसे लागतात, साडेचार वर्षामध्ये तुम्ही शहरामध्ये काय दिवे लागवे हे आता जनतेने विचारले पाहिजे.” असे प्रतिपादन  शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केले. नगरमध्ये आयोजित केलेल्या एका सभेत ते बोलत होते.

तसेच “योग्य पद्धतीचे काम चांगल्या प्रकारचे नियोजन, सामान्यांना न्याय देण्याचे काम आज पर्यंत फक्त शिवसेनेने केले आहे. शिवसेनेने कोणाच्या जमिनी लाटल्या नाही, गुंडगिरीला थारा दिला नाही. कधीही कोणाच्या फ्लॅट मध्ये घुसले नाही, कोणाच्या कंपन्या घेतल्या नाही, कोणालाही आत्महत्येला प्रवृत्त केले नाही, हे आम्ही कधीच केले नाही. शिवसेनेने जनतेला दिले ते प्रेम, संरक्षण सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर रस्त्यावर उतरणारी ही शिवसेना आहे. म्हणून महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगव्या सोबत आता त्याच्या बरोबर नीळा आणि पिवळा हि आलेला आहे. भगवा रंग म्हणजे त्यागाचे प्रतीक आहे. निळा रंग हा शांततेच्या, आधात्मिकतेचा प्रतिक आहे. म्हणून हि सर्व रंग एकत्र आली तर या नगर शहराचा विकासाचा रंग बदलून जाईल” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राठोड म्हणाले “नगर शहरात एक वेगळा इतिहास घडतोय याठिकाणी शिवशक्ती आणि भीमशक्ती एक आहे. हे चारही उमेदवार या भागामध्ये निवडून येणारी आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी संघटना म्हणजे शिवसेना. काही लोक म्हणतात तुम्ही 25 वर्षामध्ये काय केले. खरे म्हणजे जनतेने 25 वर्ष तुम्हाला बाजूला ठेवले, दूर ठेवले. साडेचार वर्षात  काय झालेले या नगर शहरामध्ये हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या नगरशहराचे बिहार केले. त्यात दादागिरी, गुंडगिरी आणि हात्याकांड करण्यात राष्ट्रवादी एकदम पक्की. सामान्य लोकांना जनतेला नगर शहरामध्ये शांतता पाहिजे. लोकांना संरक्षण भेटले पाहिजे.” शांतता, संरक्षण हे 25 वर्षामध्ये शिवसेनेने दिल्यांचे त्यांनी सांगितले.

चार वर्षापासून नगर शहरात घडलेल्या घटनांनी जो काळा रंग पडला आहे. तो आपल्याला बदलायचा आहे. आणि तीच ताकद ही भगवा, निळा, पिवळा या रंगात आहे असा निर्धार त्यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे निलेश भाकरे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यांचे स्वागत उपनेते अनिल राठोड यांनी केले. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, घनश्याम शेलार, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, सभागृहनेते गणेश कवडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष रवी वाकळे, शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर,  परिसरातील नागरिक भव्य संखेत उपस्थित होते.