शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे, मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची तर मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली. शिवसेना भवन येथे नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा ठराव मांडला. राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्य प्रतोद पदासाठी सुनील प्रभू यांच्या नावाचा ठराव मांडला. हे दोन्हीही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

शिवसेनेच्या आजच्या बैठकीत गटनेतेपदी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदार तसेच सहयोगी आमदार या बैठकीसाठी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेवर निवडून आल्याबद्दल सर्व आमदारांचे अभिनंदन केले. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्याबाबतचा ठराव मांडला. या ठरावाला आमदार प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, संजय राठोड, सदानंद सरवणकर, राजन साळवी यांनी अनुमोदन दिले. त्यापाठोपाठ राज्यमंत्री दादा भुसे यांनी सुनील प्रभू यांची विधानसभा मुख्य प्रतोदपदी निवड करण्याचा ठराव मांडला.

या ठरावाला राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार उदय सामंत, बालाजी किणीकर यांनी अनुमोदन दिले. हे दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, ऍड. लीलाधर डाके, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, गजानन कीर्तिकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, उपनेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे, शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.