कोल्हापुरात रुग्णांची लूटमार थांबवण्यासाठी शिवसेना सरसावली

401

शासनाने परवानगी दिलेल्या आणि महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेत समावेश असलेल्या कोविड खासगी रुग्णालयात रुग्णांची लुटमार रोखण्यासाठी  शिवसेना सरसावली आहे. अशा खासगी रुग्णालयासमोर शासकीय उपचाराचे दरफलक लाऊन, हेल्पलाईन नंबरही देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक होत असुन, बाधीतांची संख्या आता सात हजारच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. उपचारासाठी प्रशासनाची यंत्रणा तोकडी पडत आहे. बेड नसल्याचे सांगुन रुग्णाला परत पाठवणे,उपचाराविना रुग्णांचा मृत्यू होण्याच्या संख्येतील वाढ तसेच खासगी रुग्णालयाकडुन रुग्णांची होणारी भरमसाठ वाढ पाहता,जिल्हा प्रशासन आणि रुग्णांना मदतीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सरसावली आहे.

अनेक खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू करण्यात येत आहेत. यासाठी शासकीय दर ठरविण्यात आले आहेत. शिवाय शासनाच्या महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनाही लागु केली आहे. तरी सुद्धा रुग्णांची लुटमार होत आहे. हा गैरप्रकार रोखण्यासाठी आजपासुन अशा खासगी रुग्णालयासमोर शिवसेनेकडुन दरपत्रकाचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच संपर्कासाठी हेल्पलाईन नंबरही देण्यात आले आहेत.जर सर्वसामांन्य रुग्णांची कोणत्या खासगी रुग्णालयात लुटमार होत असेल तर नागरिकांनी शिवसेनेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. त्या खासगी रुग्णालय प्रशासनाला वठणीवर आणु असा इशारा देत, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यास कटिबद्ध असल्याचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुजित चव्हाण शिवाजी जाधव,मंजित माने,तुकाराम लाखे, अभिजात बुकशेट,प्रसाद अडनाईक,निलेश जाधव,प्रवीण पालव आदी शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या