
राजकारण म्हणजे दलबदलूंचा आखाडा नाही. येथे वारंवार बाप बदलून चालत नाही. तसे केल्यास त्यांची वाट लागते हे महाराष्ट्र उघडय़ा डोळय़ांनी बघत आहे. तीच अवस्था मिंधे गटाची होईल, अशी टीका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. मुख्यमंत्री नेहमी सांगतात मी रस्त्यावर काम करणारा मुख्यमंत्री आहे, पण रस्त्यावरील याच मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांना रस्त्यावर आणले असल्याचे त्या म्हणाल्या. देशात आणि राज्यात आज महिला सुखी नाहीत. कारण त्यांच्याशी संबंधित असलेल्या गॅसपासून साखरेपर्यंत सर्वत्रच महागाई गगनाला भिडली आहे, बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नाही याचे सरकारला सोयरसुतक नसल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली असून त्याची सुरुवात कर्नाटकातून झाली आहे. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल, असा विश्वासही पेडणेकर यांनी व्यक्त केला.

























































