
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. या अभियानाच्या निमित्ताने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे स्वत: नागपुरात पोहोचले आहेत. या अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या अभियानाला मिळणारं यश, त्याच्या होणाऱ्या बातम्या यापासून लक्ष विचलित करण्यासाठी ईडीने मंगळवारी दुपारी कारवाईला सुरुवात केली असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या राज्यात भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून दहशत निर्माण करण्याचा , दडपशाहीचा प्रयत्न करत असल्याची टीका देशातील जवळपास सगळ्या भाजपविरोधी नेत्यांनी केली आहे. ‘ही बदनामीची मोहीम उद्या तुमच्यावर उलटणार आहे’, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे.
एका खासगी मराठी वृत्तवाहिनीने संजय राऊत यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांना पुष्पक ग्रूप ऑफ कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल विचारण्यात आलं. ईडीचं मुख्यालय खरं तर दिल्लीत आहे मात्र प.बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपविरोधी सरकार आल्यापासून ईडीने त्यांचं हेडक्वार्टर प.बंगाल आणि महाराष्ट्रात आणून ठेवलंय असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आम्ही काही पुरावे पंतप्रधान कार्यालयाला दिले होते, मात्र त्याकडे कोणाचंच लक्ष नसून ठराविक लोकांनाच लक्ष्य़ केलं जात असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. ‘भाजपच्या किरीट सोमय्यांनी ज्यांच्याविरूद्ध घोटाळे, भ्रष्टाचाराबद्दल ईडीकडे कारवायांची मागणी केली ते सगळे नंतर भाजपमध्ये गेले, त्यानंतर या महाशयांची वाचा गेली.’ असं म्हणत राऊत यांनी भाजपला आरसा दाखवला.


























































