नगरमधील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र झटणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी, नगर

संपूर्ण राज्यावर यंदा दुष्काळाचे भयावह सावट असून नगर तालुक्यातही येणार्‍या काळात दुष्काळाच्या झळा तीव्र होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी, जनावरांना चारा मिळवून देत दुष्काळात सर्वसामान्यांसाठी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत शिवसेनेचे पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी झोकून देऊन काम करणार आहेत. याची सुरुवात पंचायत समिती सभापती रामदास भोर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. सर्वप्रथम बुर्‍हाणनगर पाणी योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थी गावातील जनतेला होऊन त्यांना पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दुष्काळात नगर तालुक्यातील शेतकर्‍यासह पशुधन वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक जण जबाबदारी पार पाडून अहोरात्र झटेल, असे प्रतिपादन जि.प.सदस्य संदेश कार्ले यांनी केले.

नगर तालुका पंचायत समिती सभापती रामदास भोर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करीत शिवसेनेने बुर्‍हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना शंभर टक्के क्षमतेने कार्यान्वित राहिल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या अंतर्गत पाणी योजनेची ठिकठिकाणी पाहणी करून गळती शोधून दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, पाण्याची चोरी थांबवणे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या दरम्यान दुरुस्ती कामे, पाईपलाईनच्या कामांच्या ठिकाणी जावून सभापती भोर, कार्ले यांनी आवश्यक सूचना दिल्या. यावेळी जि. प. सदस्य शरद झोडगे, शिवसेनेचे नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता जी. एस. भोसले आदी उपस्थित होते.

सभापती भोर म्हणाले की, बुर्‍हाणनगर पाणी योजनेत तालुक्यातील 38 गावांचा समावेश आहे. या प्रत्येक गावाला योजनेतून आवश्यक पाणीपुरवठा होवून दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी पावसाने अत्यल्प हजेरी लावल्याने शेतीतून उत्पादन मिळू शकलेले नाही. पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर बनणार आहे. हि बाब लक्षात घेऊन वेळीच शाश्वत उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगर तालुक्यात कार्यरत असलेल्या पाणी योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करून त्याचे पाणी संबंधित गावांपर्यंत पोहचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनानीही दक्ष राहून सहकार्य करण्याचे आवाहन भोर यांनी केले आहे.

summary- shivsena leaders to provide help to drought victims