शिर्डी व नगर येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत महामेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे रविवारी (दि.२१) नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून शिर्डी व नगर येथे त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या अमृत अंतर्गत पाणी योजना व भुयारी गटार योजनेच्या कामाचा शुभारंभही उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अनिल राठोड म्हणाले की, उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता शिर्डी येथे तर दुपारी १ वाजता नगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलच्या मैदानावर जाहीर मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. नगर शहरासह विविध तालुक्यांमधून कार्यकर्ते व नागरिक मेळाव्याला येणार आहेत. त्यासाठी विशेष पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्याच्या नियोजनासाठी प्रत्येक तालुक्यात जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीतमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. मेळाव्यास २० ते २५ हजार नागरिक व कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या मेळाव्याकडे लागेले आहे. दरम्यान, या मेळाव्यामध्ये तीन विद्यमान नगरसेवक पक्षात प्रवेश करणार आहेत. अन्य काही इच्छुकांशी बोलणी सुरु असून तेही या मेळाव्यातच प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे राठोड यांनी सांगितले.