‘जास्‍तीत जास्‍त सभासद  नोंदणी करा, 2019 ला सर्वात जास्‍त आमदार सेनेचे असतील’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव  

“राज्यात आपणास स्वबळावर सत्ता आणायची आहे. शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे शिवसेनेची भूमिका, विचार व केलेली विकास कामे ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले पाहिजे. मी मोठा की तू मोठा यात न गुरफटता शिवसेनेला मोठे करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने योगदान दिले तर २०१९ मध्ये पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वांत जास्त आमदार शिवसेनेचे असतील” असा विश्‍वास कोपरगाव विधानसभा मतदार संघ पक्ष निरीक्षक परेश पाटील यांनी व्यक्त केला. रविवारी कोपरगाव येथे शिवसेना सभासद व बुथ प्रमुख नोंदणी अभियानाच्‍या शुभारंभी ते बोलत होते. तालुक्‍यात भर पावसात बसणारा तर शहरात भर उन्‍हात बसणारा शिवसैनिक पाहिल्याचे  त्‍यांनी सांगितले.

परेश पाटील यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत पार पडलेल्‍या या अभियानास नगर उत्‍तर जिल्‍हा प्रमुख रावसाहेब खेवरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, उपजिल्‍हाप्रमुख प्रमोद लबडे, जिल्‍हा संघटक विजय काळे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, राहाता तालुका प्रमुख संजय शिंदे, शहरप्रमुख असुलम शेख, शिर्डी शहरप्रमुख सचिन कोते, राहाता शहरप्रमुख गणेश सोमवंशी, उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, व्‍यापारी सेना प्रमुख योगेश मोरे, महिला उपजिल्‍हा प्रमुख सपना मोरे, नगरसेविका वर्षा शिंगाडे, महिला शहरप्रमुख  विसपुते, शोक कानडे, रावसाहेब थोरात व  विभाग प्रमुख तसेच शिवसैनिक मोठया संख्येने हजर होते.

शिवसेना शाखा शिवनेरी येथेही पाटील यांच्‍या हस्‍ते सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. यावेळी शिवाजी ठाकरे यांनी  काळे-कोल्‍हे (के-के) हटाव नारा दिला. प्रमोद लबडे, सपना मोरे, अस्‍लम शेख यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. सुत्रसंचालन माजी शहरप्रमुख भरत मोरे यांनी केले. आभार विभागप्रमुख बाळासाहेब साळुंके यांनी मानले.