दापोली येथे 100 खाटांच्या रुग्णालयाला मंजूरी मिळावी, योगेश कदम यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

दापोली तालुक्यासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे 100 खाटांचे रुग्णालय मंजूर व्हावे अशी मागणी दापोली आमदार योगेश कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.  त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दापोली हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय दुर्गम तालुका आहे. इथल्या रुग्णांना उपचारांसाठी चिपळूण, रत्नागिरी, पुणे किंवा मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. आरोग्याच्या गंभीर तक्रारी असलेल्या रुग्णांना मोठ्या शहरात उपचारासाठी नेण्यात वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. याशिवाय लांबच्या प्रवासामुळे वैद्यकिय उपचार मिळण्यास विलंब झाला तर ते रुग्णाच्या जीवावर बेतण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दापोलीतील खासगी रुग्णालयात उपचार घेणे अनेकदा सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाही. यामुळे दापोली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे 100 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाची मागणी आमदार कदम यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या