
सामना प्रतिनिधी । परभणी
शिवसेना-युतीचे अधिकृत उमेदवार संजय जाधव मंगळवारी सकाळी ११ वाजता हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजपचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी शिवसैनिक, भाजपा कार्यकर्ते आणि शिवप्रेमी जनतेची प्रचंड उपस्थिती राहणार आहे.
आज सायंकाळी शिवसेनेचे परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शनही करण्यात येणार आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला आहे.
परभणी लोकसभा निवडणुकीची अधिसुचना १९ मार्च रोजी जारी करण्यात आल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ मार्च असून अद्यापपर्यंत केवळ २ स्वतंत्र उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नामांकन पत्रांची विक्री मोठ्याप्रमाणात झाली आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अद्यापही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. सोमवार व मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयासमारे कडेकोट बंदोबस्त देखील तैनात केला आहे.
यंदा प्रथमच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना विलंब लागत आहे. अनेक पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना व भाजपा युती आणि काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी नवीन चेहरा म्हणून राजेश विटेकर यांना उमेदवारी बहाल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी युवकांचे शिबिर घेत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. आता या दोन उमेदवारात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बहुजन वंचित आघाडीच्या वतीने अलमगिर मो. खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुळचे जालना येथील हे उमेदवार आहेत. तसेच भाकपाच्या वतीने राजन क्षीरसागर यांनीही निवडणुक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. अंतर्गत गटबाजीला सध्या युती आणि आघाडीने पूर्णत: विराम दिला आहे. आता वेध लागले आहेत ते केवळ उमेदवरी अर्ज दाखल करण्याचे.
सोमवारी भाकप आणि बहुजन वंचित आघाडी यांचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेश विटेकर हे त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार, उदयनराजे भोसले आणि जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तर शिवसेना-भाजपाचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार संजय जाधव हे मंगळवार, २६ रोजी शहरातून रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
निवडणुक रिंगणात आणखी कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या ३० वर्षापासून परभणी लोकसभा मतदार संघ ताब्यात आहे. आघाडीतील अंतर्गत गटबाजी अद्यापही कमी झाली नसल्याचे दिसून येत असून १३ नगरसेवकांची मने अद्यापही वळविण्यामध्ये यश आले नाही. या निवडणुकीत १९ लाख ७० हजार ९५४ मतदार संख्या आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस हाताशी असताना आत्तापर्यंत नामांकन पत्राची विक्रीच मोठ्या प्रमाणात झाली असून प्रमुख पक्षाच्या वतीने अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. तब्बल दोन दिवस सुटी असल्याने विलंब लागत आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.





























































