
शिवसेनेमुळे भाजप नेत्यांची झोप उडाली आहे. याच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन तासही झोपू द्यायचे नाही, असा सणसणीत टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला आजपासून सुरुवात झाली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत नागपुरात आले असून विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसातून 22 तास जागे असतात ते केवळ 2 तास झोपतात. सध्या मोदी एक प्रयोग करत असून तो म्हणजे त्यांना झोपावे लागणार नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यासंदर्भात विचारले असता संजय राऊत म्हणाले, हे विधान मोदीजींनी केलेले नाही. आम्ही दिल्लीत असतो. मोदीजी 18-18 तास काम करतात, हे आम्हाला माहिती आहे, पण आता त्यांना दोन तासही झोपू द्यायचे नाही, हा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा इरादा दिसतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करीत असल्याचेही राऊत म्हणाले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार प्रकाश जाधव उपस्थित होते.


























































