2014 मध्ये भाजपने युती तोडली, तेव्हा हे सर्व कुठे होते; संजय राऊत यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युती भाजपने तोडली आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 2014 मध्ये भाजपनेच युती तोडली होती, त्यावेळी हे सर्व कुठे होते. तसेच 2019 मध्ये भाजपने शब्द फिरवल्याने आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असेही राऊत यांनी सांगितले. त्यामुळे युती तोडण्याचे काम भाजपनेच केले आहे. युती तुटायला शिवसेना जबाबदार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेत सर्व गोष्टी सांगतात. महाविकास आघाडीवेळीही त्यांनी ही आघाडी कोणत्या परिस्थितीत आपण करत आहोत, ही परिस्थिती भाजपने आपल्यावर लादली आहे, असे पक्षप्रमुखांनी सांगितले होते. त्यावेळी सर्वांनी या भूमिकेचे स्वागत केले होते. तसेच भाजपला धडा शिकवण्याची ही चांगली संधी असल्याचे ते म्हणाले होते. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे भाजपला धडा शिकवला पाहिजे, असे त्या सर्वांचे मत होते. तसेच युती भाजपनेच तोडली असल्याचे शिवसेना नेते, खायदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फक्त राजकीय संबंध नाहीत. बाळासाहेबांच्या काळापासून आम्ही त्यांना दिलेला पाठिंबा, दिलेली ताकद हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्या काळापासून त्यांचे संबंध आहेत. राजकारणात कितीही उलटफेर झाले तरी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध पूर्वीसारखेच आहेत. त्यामुळे मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत किंवा त्यावेळी युतीची चर्चा झाली, असा दावा करणाऱ्यांना आणि त्या दाव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही.

2014 मध्ये भाजपने युती तोडली, त्यावेळी हे सर्व कोठे होतो. त्यावेळी त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते का, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला युती हवी होती, ती आम्ही तोडली नाही. युती कायम राहावी, यासाठी 2014 मध्ये आम्ही प्रयत्न करत होतो. त्यावेळी भाजपने युती का तोडली, त्यावेळी हे कोठे होते. तसेच 2019 मध्येही भाजनेच युती तोडली. त्याला शिवसेना जबाबरदार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगणारे हे लोक आहेत, त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा.ते आमचे सहकारी होते, आजही ते आमचे सहकारी आहेत. मात्र, त्यांना उत्तर द्यायला आम्ही बसलेलो नाही. युती भाजपने तोडली आहे, शब्द त्यांनी फिरवला आहे. शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांवर ज्या पद्धतीने टीका केली, त्यावेळी किती लोक आमच्या पाठिशी होते, किती लोकांनी हल्ले परतावून लावले, त्यांना बोलायचा काही अधिकार नाही. आम्ही सातत्याने पक्षाची बाजू मांडत आहोत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, हा पक्षाचा निर्णय आहे, त्याबाबत त्यांना बोलण्याचा अधिकार नाही.

आम्ही एनडीएतून बाहेर पडलेलो आहोत, हे आम्ही वेळोवेळी स्पष्ट केले आहे. भाजपने 2019 मध्ये शब्द पाळला असता, तर एकनाथ शिंदे हे त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. भाजपनेच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपने त्यांची फसवणूक केली आहे. आता त्यांच्याकडे आकडे असतील. मात्र, 2024 च्या निवडणुकीत आजचा आकडा बदलला असेल. त्यावेळी मॅटनी शो आणि सर्व शो आमचे असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रलोभन आणि दबाव आमच्यावरही आहे. मात्र, अशा काळात आम्ही पक्षासोबत आहोत. प्रलोभनांना आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करून दाखवतो आणि दबावाला झुगारून देतो, म्हणून आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला मोह आणि भय नाही. केंद्रीय तपास यंत्रणाचे पोलीस आम्हाला अटक करतील, जगाला कळू द्या, देशात काय सुरू आहे, असेही ते म्हणाले.

फुटलेला गट नाही, गटार आहे, ते काय करतात ते करू द्या. आजही तांत्रिकदृष्या ते शिवसेनेचे खासदार आहेत. ते आमचे सहकारी आहेत. त्यांच्यावर आपण टीका करणार नाही. आम्ही त्यांना निडणुकीत पक्ष म्हणून उत्तर देऊ, राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. शिवसेनेने असे अनेक प्रसंग खिलाडूवृत्तीने स्वीकारले आहेत.आज त्यांच्याकडे आकडे आहे, असे ते म्हणातात, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उत्तर देण्यात येईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

आपले रामदास कदम यांच्याशी बोलणे झाले आहे. कदम यांची भूमिका वेगळी असेल, ती त्यांनी मांडली. आम्हाला पक्षाने भरभरुन दिले आहे. जे काही मिळाले, ते शिवसेना या चार अक्षरांमुळे मिळाले. अनेकांना मंत्रीपदे मिळाली आहे. त्यामुळे जे मिळाले नाही, त्यांची खंत नाही. शिवसेना ही आमची आई आहे. त्यामुळे शक्य ते सर्व पक्षासाठी आम्ही करत आहोत, असे ते म्हणाले.