
सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा गळा घोटणाऱया विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात सर्वत्र संताप होत आहे. शिवसैनिकांनी हुकूमशाही सरकारची अंत्ययात्रा काढून आणि मौदा येथील कन्हान नदी परिसरात तिसऱया दिवसाचा कार्यक्रम करून जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच मृत सरकारच्या शांतीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्यासह शिवसैनिकांनी केशार्पण केले.
शिवसेनेच्या जिवावर मोठे झालेले आणि त्याच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करणारे आज भाजपचे तळवे चाटत आहेत. या निकालानंतर हेच गद्दार जल्लोष साजरा करत आहेत. सत्तेचा माज करणाऱया भाजप सरकारला जनता माफ करणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये जनता हुकूमशाही सरकारची तिरडी उचलल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी व्यक्त केली. माजी खासदार प्रकाश जाधव, विदर्भ संपर्कप्रमुख सुरेश साखरे, रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे, रामटेक लोकसभा सहसंपर्कप्रमुख उत्तम कापसे, जिल्हा संघटक राधेश्याम हटवार, तालुकाप्रमुख कैलास खंडार, मौदा संपर्कप्रमुख नरेश भोंदे, कामगार सेना जिल्हाप्रमुख समीर मेश्राम, गणेश मस्के, उपजिल्हाप्रमुख दीपक मुळे, रमेश तांदूळकर यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


























































