
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
शिवसेना आणि भाजपाने देशहितासाठी आपापसातले मतभेद मिटवून युती केली. राष्ट्रहितासाठी आपण एकत्र आलो. त्याच पद्धतीने भीषण दुष्काळाचा मुकाबला करत असलेल्या महाराष्ट्राकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत बोलताना केली.
देशहितासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत आपण एकत्र आलो. या एकजुटीची ताकद 23 मे रोजी संपूर्ण देशाला दिसणार असून, शिवसेना –भाजप युतीने महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 48 जागा जिंकल्या तरी आश्चर्य वाटायला नको, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखविला. शिवसेना–भाजप युती महाराष्ट्रात विरोधकांना पुरते नेस्तनाबुत करेल आणि दिल्लीत स्थिर व सक्षम सरकार आणण्यात मोलाचा वाटा उचलेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.
एनडीएच्या घटकपक्षांची बैठक आयोजित केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानले. त्याचबरोबर एनडीएच्या घटकपक्षांनी दाखविलेल्या एकजुटीबद्दल या मित्रपक्षांनाही धन्यवाद दिले. यावेळी उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद मोदी यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना नेते व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हेही यावेळी उपस्थित होते.
दुष्काळाकडे वेधले देशाचे लक्ष
महाराष्ट्रात अभूतपूर्व अशी दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही जनतेला मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्याचबरोबर जनावरांचाही अवस्था तर खूपच दयनीय आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्याने महाराष्ट्रातील दुष्काळाकडे विशेष लक्ष देऊन महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
दुष्काळ व पाणीप्रश्नावर दूरगामी काम करावे लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका
एनडीएच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोटतिडकीने मांडलेल्या दुष्काळाच्या प्रश्नाची तातडीने गांभीर्याने दखल घेत पंतप्रधान नद्रें मोदी यांनी दुष्काळ आणि पाणी प्रश्नावर दूरगामी काम करण्याची गरज यावेळी बोलताना व्यक्त केली. महाराष्टातील भीषण दुष्काळाचा उल्लेख करताना दुष्काळग्रस्त महाराष्टाला पंतप्रधानांनी विशेष लक्ष देऊन दिलासा द्यावा, अशी आग्रही भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. तोच धागा पकडत पंतप्रधान नरेंदर् मोदी यांनी, दुष्काळाचे मोठे आव्हान देशापुढे आणि सरकारपुढे असल्याचे सांगत, उद्धव ठाकरेंनी मांडलेला मुद्दा अतिशय रास्त असून दुष्काळ आणि पाणी प्रश्नावर दूरगामी असे काम करावे लागेल. त्या दृष्टीने आपले सरकार काम करेल, असे नमूद केले.


























































