
सामना ऑनलाईन,महाड/कर्जत
युतीची चर्चा सुरू असल्याच्या बातम्या सुरू आहेत. पण या बातम्या ते सोडताहेत आम्ही नाही. माझ्याकडून युतीबाबत चर्चाही नाही किंवा उत्तरेही नाहीत. असे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी आज भाजपच्या दाव्यांची हवाच काढून टाकली. 2019च्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता भ्रमाचे भोपळे, राजकीय गाजरांचे वाटप होईल, थापांचे पीकही जोमात येईल, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
गेले काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदकांत पाटील हे सातत्याने शिवसेना-भाजपा युती होणारच, असे परस्पर हवाले देताहेत. या सर्वांच्या हवाल्यांची हवाच उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर सभेत काढून टाकली.
उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱयातील मेळाव्यांचा दुसरा टप्पा कोकणातून सुरू झाला. रायगड जिल्हय़ातील गटप्रमुख, बुथप्रमुख आणि पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी महाडमध्ये भिल्लारे मैदान व कर्जतमध्ये पोलीस मैदानात मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. जय भवानी जय शिवाजी… शिवसेना झिंदाबाद, अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सत्तांध हत्तीवर अंकुश मारणारच
तुम्ही सत्तेत आहात मग तुम्ही काय करता? असे विरोधक नेहमी विचारत असतात. होय, आम्हाला सत्ता पाहिजेच, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा झाला पाहिजे, आम्ही तो करणारच; पण तोपर्यंत जसं मदांध हत्तीवर अंकुश ठेवण्याचं काम माहूत करतो. तसंच सत्तांध हत्तीवर मी शिवसेनेचा अंकुश मारणारच. कारण आम्ही उतरलो तर हा सत्तांध आणखीनच माजेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
कपाटातील नव्हे, मैदानातली माणसं
‘ठाकरे’ या सिनेमाचा उल्लेख करुन उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत ‘ठाकरे’ हा सिनेमा काढताहेत. या सिनेमाच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस मी आवर्जून स्टुडिओत गेलो होतो. तेव्हा तिथे काही पत्रकार मला म्हणाले, शिवसेनाप्रमुख हे कधीही आत्मचरित्र लिहिणार नाहीत, असे त्यांनी सांगितले होते. त्याबाबत तुमच्याशी काही बोलणं झालं होतं का, त्यावर ‘आत्मचरित्र लिहिलं तर ते कपाटात जाईल. मी कपाटातला माणूस नाही, मैदानातला माणूस आहे’, असं शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलं होतं. आता मैदानं म्हटली की युद्धं असतात. शिवसैनिक आहोत आणि सैनिक म्हटल्यावर युद्ध हे होणारच. म्हणून 2019च्या युद्धासाठी सज्ज व्हा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
नानासाहेब धर्माधिकारी यांच्यासारखे काम करा
दासबोधाचे ज्येष्ठ निरूपणकार स्व. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या एका कार्यक्रमाची आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले, नानासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी एका कार्यक्रमात गेलो होतो. तिथे अक्षरशः जनसागर लोटला होता. नानासाहेब मला म्हणाले, ही जी लोकं इथे जमली आहेत ती उगाच आलेली नाहीत. मी पासष्ट वर्षे त्यांच्या घराघरात गेलोय. हल्ली गर्दी जमवण्यासाठी पैशांचे वाटप केले जाते. पण नानासाहेबांच्या सत्कारसोहळय़ासाठी आलेली गर्दी ही पैसे देऊन आणलेली नव्हती. ते तुमच्याकडे मतेही मागायला आले नव्हते. त्यांनी घराघरात जाऊन जगायचं कसं हे शिकवलं. माणूस आणि जनावरातला फरक त्यांनी सांगितला. धर्माधिकारी कुटुंबाने सर्वसामान्यांना आधार दिला. त्यांच्यासारखं काम आपल्याला करायचंय.
घराघरात जा, पारावर बसा,भाजप सरकारची पापं सांगा
महाराष्ट्रात भयानक दुष्काळ पडला आहे. पावणदोनशे तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केलाय. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. लोकं रस्त्यावर उतरू लागली आहेत. दुष्काळ जाहीर केला पण दुष्काळी कामे सरकार केव्हा सुरु करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. निवडणूक जवळ आली आहे आता पुन्हा भ्रमाचे भोपळे आणि राजकीय गाजरे गावागावात वाटली जातील. थापांचे पीक जोमात येईल. आता पुन्हा गाजराच्या पिकाला पाणी देणार का, असा सवाल करतानाच आपल्याला खोटं बोलून सत्ता नको, मला खोटं मतही नको पण गावागावात जा, मतदारांच्या घरोघरी पोहोचा, पारावर बसा आणि सरकारच्या कोणत्या योजनांचा लाभ झालाय हे लोकांना विचारा. राफेल प्रकरण काय आहे हे त्यांना सांगा. सगळय़ा योजना खोटय़ा आहेत हे दाखवून द्या. भाजप सरकारची पापंही सांगा, असा आदेशच त्यांनी गटप्रमुखांना दिला.
येत्या निवडणुकीत शिवरायांच्या रायगडात फक्त शिवसेनेचा भगवाच फडकेल, असा विश्वास शिवसेना नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. तर रायगडातून सुनील तटकरे आणि जयंत पाटील ही दोन संस्थाने कायमची खालसा करू, असा निर्धार शिवसेना नेते व केंदीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, चित्रपट सेना अध्यक्ष आदेश बांदेकर, आमदार भरत गोगावले, मनोहर भोईर, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद म्हात्रे, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, विलास चावरी, दत्ता दळवी, महिला संपर्क संघटक सुवर्णा करंजे, किशोरी पेडणेकर, रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, रायगड जिल्हाप्रमुख रवी मुंढे, किशोर जैन, रत्नागिरी संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, रायगड जिल्हा महिला संघटक ऍड. अनिता पवार, रेखा ठाकरे, उपजिल्हाप्रमुख महेंद थोरवे, बिपीन महामूणकर, जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, युवा सेनेचे योगेश कदम, विकास गोगावले यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
वल्लभभाई पटेलांइतकी तुमची उंची आहे काय ?
सरदार वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा पंतप्रधान मोदींनी उभारला. वल्लभभाईंइतकी तुमची उंची आहे काय? कोर्टाचे सगळे अडथळे झुगारुन वल्लभभाईंनी सोमनाथ मंदिराचे पुनर्निमाण केले मग राममंदिर बांधायला तुम्हाला कोणती अडचण आहे? निजामाचे संस्थान खालसा करून वल्लभभाईंनी ते हिंदुस्थानात आणले. पाकव्याप्त कश्मीर तुम्ही हिंदुस्थानात केव्हा आणणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
राफेलचे टेंडर बचत गटांना देणार का?
राफेल विमाने खरेदी करण्याचे टेंडर तीनपट अधिक दराने 15 दिवस आधी स्थापन झालेल्या अंबानीच्या कंपनीला दिले,तुम्ही विमाने खरेदी प्रकरणाला पापड लाटण्याचे टेंडर समजता काय? हे टेंडर बचत गटांना देणार काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मनसे,भाजप,राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत
मनसेचे माजी तालुक अध्यक्ष रमेश मते, मनसे वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष प्रवीण डायरे, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष प्रभाकर जाधव, भाजप विद्यार्थी मोर्चाचे तालुका अध्यक्ष नरेश जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
आम्ही राममंदिरावर बोललो तर तुम्हाला पोटशूळ का?
राममंदिराच्या मुद्दय़ावर राजकारण करणाऱया मोदी सरकारचे उद्धव ठाकरे यांनी वस्त्रहरण केले. राममंदिरावरुन fिशवसेनाप्रमुखांनी संपूर्ण देशात आगडोंब उसळवला होता. तुम्ही तर राममंदिर बांधलंच नाही; पण आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला पोटशूळ का उठतो, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, बाकी गोष्टींचा निर्णय कोर्टात पटापट होतो, पण राममंदिराची केस अवघ्या तीन मिनिटांत उडवली. आम्ही मात्र पिढय़ान्पिढय़ा वाट बघतोय. रामलल्ला आऐंगे… अरे पण कधी? रामलल्ला विचारातो, अरे तू येणार आहेस की नाही? म्हणूनच मी मुद्दाम आयोध्येत 25 नोव्हेंबरला जाऊन मोदींना याचा जाब विचारणार आहे. एकदा तुम्ही सांगा, राममंदिर हा जुमला होता. मग 280 वरुन 2 वर आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, असे फटकारे त्यांनी लगावले.



























































