
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
राष्ट्रीय सुरक्षेची चिंता करणारे, राष्ट्राच्या विकासाकरिता समर्पण भाव राखणारे, राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या योग्यवेळी मुसक्या आवळणारे आणि मातृभूमीच्या सन्मानासाठी कायम झटणाऱ्या पक्षाचे सरकार केंद्रात पुन्हा स्थापन होण्यासाठी भाजपा-शिवसेना युती एकत्र व एकदिलाने लढा देण्यास सज्ज झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या स्वप्नातील ‘स्वस्थ व सशक्त’ हिंदुस्थानची उभारणी करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रचारात झोकून द्यावे, असे आवाहन शिवसेना नेते अरविंद नेरकर यांनी केले. चंद्रपुरात शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला भाजप-शिवसेना-रिपाई (आ.) महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुरेश सावंत, माजी आमदार विश्वास नांदेकर, शिवसेना नेते रमेश देशमुख, जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे , महिला प्रमुख डॉ. दुधानी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व शिवसेनेच्या सर्व आघाडयांचे प्रमुख, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व शहर, तालुका प्रमुख उपस्थित होते. नेरकर यांनी सांगितले की, देशाला लुबाडणाऱ्या पक्षाला सत्तेबाहेर घालवून राष्ट्रभक्ती जोपासणाऱ्या पक्षाचे सरकार केंद्रात स्थापन करण्यासाठी शिवसैनिकांनी झोकून द्यावे. तसेच शिवसेनेशी विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवावा असे आवाहनही त्यांनी केले. हंसराज अहीर प्रभावी नेते व कार्यक्षम लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यासारख्या विकासाला वाहून घेणाऱ्या उमेदवाराला पुन्हा संसदेत पाठवून शिवसैनिकांनी आपले कर्तव्य पार पाडावे.या कार्यक्रमात हंसराज अहीर, सुरेश सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी मार्गदर्शन केले.

























































