
सामना प्रतिनिधी । नागपूर
नागपूरची आन-बान-शान असलेले १२५ वर्ष जुने महाराजबाग प्राणिसंग्रहालय कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही़ वेळ पडली तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी खा. प्रकाश जाधव यांनी दिला.
महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाने रद्द केल्याने नागपूरकरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे़ शुक्रवारी दुपारी दीड वाजता शेकडो शिवसैनिकांनी कृषी विद्यापीठावर धावा बोलत, महाराजबाग प्राणिसंग्रहालय येथे तिव्र निदर्शने केली. ‘शिवसेनेची एकच पुकार, नही बंद होने देंगे महाराजबाग, महाराजबाग बेचने वालो को जुते मारो सालो को’ अशा घोषणा देऊन महाराजबाग परिसर दुमदुमुन टाकला होता. प्राणिसंग्रहालयातून हा मोर्चा थेट पंजाबराव कृषी विद्यापीठात शिरला. कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एऩडी. पार्लावार यांना खाली बोलवा, असा इशारा शिवसैनिकांनी प्रशासनाला दिला. त्यानंतर, पोलिसांच्या मध्यस्थीने पार्लावार यांची भेट घेतली. प्रकाश जाधव यांनी, प्राणिसंग्रहालय बंद करण्यामागे राजकीय षडयंत्र आहे का, प्राणिसंग्रहालयासाठी केंद्र सरकारकडे कितीवेळा पाठपुरावा केला, प्राधिकरणाने सुचविलेल्या अटींची पुर्तता का केली नाही, असा सवाल करत या करिता विद्यापीठच जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश जाधव यांनी केला. यावर बोलताना पार्लावार यांनी सांगितले की, आम्ही तीन वेळा मंजूरीकरिता प्रस्ताव पाठविला. परंतु, प्राधिकरणाकडून तो प्रस्ताव पारित न करण्यात आल्यामुळे अटींची पूर्तता केली गेली नाही. दरम्यान, प्राधिकरणाकडूनच मान्यता रद्द करण्याचा आदेश आला. या आदेशाच्या विरोधात केंद्र सरकारकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट करत प्राधिकरणाच्या अटींची पूर्तता लवकरात लवकर करून, कोणत्याही परिस्थितीत प्राणिसंग्रहालय बंद पडू देणार नाही, असे आश्वासन पार्लावार यांनी यावेळी दिले. याप्रसंगी शिवसेनेचे सुरज गोजे, नितीन तिवारी, गुड्डू रहांगडाले, रवनिश पांडे, राजू तुमसरे, हितेश यादव, समीर पालकर, गजानन आकरे, नत्थूलाल दारोटे, रमेश मोरे, किशोर राठोड, प्रवीण दिकोंडवार, नितीन साळवे यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.
























































