मेट्रो स्थानक नामफलकातील जाहिरातदारांची नावे तत्काळ हटवा; शिवरायांचा अवमान करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध, शिवसेनेचे सीएसएमटीजवळ आंदोलन

भुयारी मेट्रो स्थानकांच्या नावांमध्ये जाहिरातदारांची नावे घुसवणाऱ्या मेट्रो प्रशासन आणि महायुती सरकारला शुक्रवारी शिवसेनेने तीव्र आंदोलन करून दणका दिला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नावाआधी जोडलेले ‘कोटक’ बँकेचे नाव स्टिकर लावून झाकण्यात आले. याविरोधात शिवसेनेने तीव्र आंदोलन करत महायुती सरकारचा निषेध केला. मेट्रो स्थानकांच्या नामफलकातील जाहिरातदारांची नावे तत्काळ हटवण्याची जोरदार मागणी शिवसैनिकांनी केली.

भुयारी मेट्रोचा वरळी सायन्स म्युझिअम ते कफ परेडपर्यंतचा टप्पा लवकरच प्रवासी सेवेत खुला केला जाणार आहे. त्याच्या उद्घाटनाआधी स्थानकांची नावे जाहिरातदारांच्या घशात घालण्यात आली आहेत. मेट्रो प्रशासन आणि महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा स्मारक चौक या मेट्रो स्थानकांच्या नावामध्येदेखील जाहिरातदारांची नावे घुसवली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाचे ‘कोटक’ छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असे नामकरण केले. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्म्यांचा अवमान केल्याच्या निषेधार्ध शिवसेनेने मेट्रो स्थानक प्रवेशद्वारावर शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 तर्फे हे आंदोलन केले. या आंदोलनात विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला विभाग संघटक युगंधरा साळेकर तसेच पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.