शिवसेनेचा पाठपुरावा; श्रेयासाठी मिंधे गटाची वाटमारी, प्रभादेवीमधील डांबरीकरणाचे श्रेय घेण्याचा डाव रणरागिणींनी हाणून पाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभादेवी परिसरातील डांबरीकरणाचे काम न करता त्याचे श्रेय घेऊन नाव कमवण्याचा मिंधे गटाचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेच्या रणरागिणींनी हाणून पाडला. काम न करता डांबरीकरणाचे श्रेय लाटायला आलेल्या मिंधे गटाला महिला शिवसैनिकांच्या कडव्या प्रतिकारामुळे माघार घेत हात हलवत मागे फिरावे लागले.

प्रभादेवीमधील मुरलीधर सामंत मार्ग हा प्रभादेवी आणि परळ लोकल स्थानकांना जोडणारा मार्ग असल्यामुळे या मार्गावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्याचबरोबर बेस्ट तसेच शेअर टॅक्सीही मोठय़ा प्रमाणात प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे काही ठिकाणी खड्डे पडून उखडला होता. त्या पार्श्वभूमीवर, या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लवकर व्हावे यासाठी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी पालिका जी-दक्षिण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत रस्ते अभियंता तसेच संबंधित अधिकाऱयांची बैठक घेऊन वेळोवेळी सूचना केल्या. त्यामुळे पालिकेने या मार्गाचे डांबरीकरण केले. याचे श्रेय लाटण्यासाठी मिंधे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी परिसरात हे डांबरीकरण आपण केल्याची पोस्टरबाजी केली आणि शिवसेनेच्या एक दिवस आधीच या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, शिवसेना महिला उपशाखा संघटक शैलजा पवार या महिला कार्यकर्त्यांसह समाधान सरवणकर यांना भिडल्या. त्यांनी समाधान सरवणकर यांच्या नेतृत्वाखालील मिंधे गटाचा कडवा प्रतिकार करत परतवून लावले. दरम्यान, दोन दिवसांनी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी डांबरीकरण केलेल्या या मार्गाचे शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थित उद्घाटन केले.