‘प्रत्येक चौकात लोकांनी फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे’, संजय राऊतांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज बीड येथे गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. यावेळी गोपीनाथ गडावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘नोटबंदी जर अयशस्वी ठरली तर मला भर चौकात फाशी द्या’, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “प्रत्येक चौकाचौकात लोकांनी जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. लोकांनी पंतप्रधानांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. मी या देशात किती लोकांचं नुकसान केलं हे त्यांना स्वतःलाच कळायला पाहिजे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान केलं, बेरोजगारी वाढवली, महागाई वाढवली, व्यापार उद्योग व लघुउद्योग बंद पडले. नोटबंदी केल्यामुळे काळा पैसा येईल ही त्यांची पहिली घोषणा होती. मात्र देशात १ रुपया तरी आला का? दहशतवाद्यांना होणारा काळ्या पैशांचा पुरवठा बंद होईल असे ते म्हणाले होते मात्र काश्मीरला जाऊन बघा काय परिस्थिती आहे ती”.

शिवसेना भाजप युती अखंड टिकावी हे गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न

“गोपीनाथ मुंडे हे राजकारणातलं दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व होतं. शिवसेना भाजप युती अखंड टिकावी हे त्यांचं कायम स्वप्न होतं. चर्चा व बैठकांमध्ये त्यांनी जाहीरपणे यासंदर्भात भूमिका मांडली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची गाढ श्रद्धा होती. ठाकरे परिवाराशी त्यांचे जवळचे संबंध होते. शिवसेना आणि भाजप हे रक्ताचे भाऊ आहेत अशी त्यांची भूमिका होती. मात्र ते गेल्यानंतर सगळीच नाती तुटली म्हणून त्यांची आठवण येते. आज ते असते तर कदाचित नाती तुटली नसती.” असे यावेळी राऊत म्हणाले.

“आम्ही जो महाराष्ट्रात आणि देशात भाजप पक्ष बघितला होता तो आम्हाला आज दिसतच नाही. आम्ही केंद्रामध्ये अटलजी आणि अडवाणीजी यांचा भाजप पक्ष पहिला. महाराष्ट्रात आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वातील भाजप पक्ष पाहिला आहे. त्यामुळे फरक तर आहेच. वारसा असतो मात्र त्या नेतृत्वाची बरोबरी कोणी करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे एकच व्यक्तिमत्व आहे. तसं गोपीनाथ मुंडे यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. गोपीनाथ मुंडे ज्या निर्भयपणे आणि निडरपणे राजकारणात वावरले, झुंजले त्यातून त्यांच्या पक्षात अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांनी नवीन कार्यकर्ते निर्माण केले. आज जे आपल्याला दिसतंय ते त्याचच फळ आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जो संघर्ष केला त्यांच्यामुळेच आज भाजप दिसत आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा म्हणून पुढे यायला पाहिजे.” असे यावेळी राऊत म्हणाले.