
शिवसेनेची मुलुखमैदान तोफ, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत येत्या बुधवारी आणि गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गडहिंग्लज, कोल्हापूर, इचलकरंजी आणि शाहूवाडी येथे मेळावा सभांमधून ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, तसेच मुरलीधर जाधव यांनी दिली.
बुधवारी (1 मार्च) सकाळी गडहिंग्लज येथील सूर्या हॉलमध्ये कागल, चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. दुपारी चारच्या सुमारास कोल्हापूर शहरात केशवराव भोसले नाटय़गृहात करवीर, तसेच कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांतील शिवसेना पदाधिकाऱयांना खासदार संजय राऊत मार्गदर्शन करणार असल्याचे संजय पवार व विजय देवणे यांनी सांगितले.
गुरुवारी (2 मार्च) शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेनंतर सकाळी 11 वाजता इचलकरंजी आणि दुपारी चारच्या सुमारास शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथील मेळाव्यात खासदार संजय राऊत हे शिवसेना पदाधिकाऱयांना मार्गदर्शन करणार असल्याचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत यांच्या या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. यावेळी बाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, रमेश पाटील, उदय सुतार, शुभांगी पोवार, प्रशांत नाळे, विठ्ठल पाटील आदी शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


























































