
सामना प्रतिनिधी । कर्जत
27 जानेवारीला होणाऱया कर्जत नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत शिवसेना महायुतीसह पूर्ण शक्तीने उतरली असून आज प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. मतदानाला अवघा पंधरवडा असल्याने शिवसेनेसह महायुतीचे उमेदवार दणक्यात प्रचार करत असून त्यांना कर्जतकरांचाही उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे ऐन थंडीत कर्जतचे राजकीय वातावरण तापणार असून विरोधकांना आतापासूनच घाम फुटण्यास सुरुवात झाली आहे.
महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 7 मधून आज कर्जतचे आराध्यदैवत धापया महाराज यांच्या मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संभाजी जगताप, संतोष भोईर, कर्जत शहरप्रमुख भालचंद्र जोशी, भाजप महिला प्रदेश सरचिटणीस कल्पना दास्ताने, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल डाळिंबकर आदी महायुतीचे नेते व थेट नगराध्यक्षापदाच्या उमेदवार सुकर्णा जोशींसह सर्व नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी धापया देवस्थान येथे कॉर्नर सभा घेण्यात आली.
कर्जतवासीयांना बदल हवा!
जातीपातीच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. त्यांना आता बदल हवा आहे. हे निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होईल, असा जबरदस्त विश्वास शिवसेनेचे विधानसभा संघटक संतोष भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे मतांसाठी मेळावे
राष्ट्रवादी पक्षाने कर्जत येथे निर्धार मेळावा घेतला. हा निर्धार मेळावा देशासाठी नसून केवळ कर्जत नगरपालिका निकडणुकीसाठीच घेतला होता, असा आरोप आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी केला.
‘सुवर्ण’काळ येणार
नगरपालिकेवर महायुतीची सत्ता येणार असल्याने यंदा कर्जतमध्ये सुवर्णकाळ अवतरल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष bसंत भोईर यांनी व्यक्त केला.


























































