
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. कर्मचारी संघटनेने यापूर्वी अनेक आंदोलने करून काही मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी राहील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय पोहोचविला जाईल. मेगा भरतीत 40 टक्के आरक्षण मिळण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आवाज उठविला जाईल. कार्यरत एकही कर्मचारी कमी केला जाणार नाही. यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासौबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, याची हमी मी देतो, असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी कंत्राटी आरोग्य कर्मचारी महामेळाव्यात बोलताना दिले.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये हा मेळावा झाला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा समन्वयक संतोष सावंत, लेखा व्यवस्थापक निलेश गावडे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमदीप पाताडे, सचिव सुवर्णा रावराणे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष स्वप्नील गोसावी, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राकेश तोडणकर हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी अन्य पदाधिकारी व शेकडोंच्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. नाईक यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने महामेळाव्यास सुरुवात झाली. प्रास्ताविक अजित सावंत यांनी तर सूत्रसंचालन दीपक ठाकरे यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ. खलीपे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी हे कुशल कामगार आहेत. ते उत्कृष्ट प्रकारे नियमित काम करीत आरोग्य सेवा देत आहेत. त्यांना अंशकालीन कर्मचाऱ्यांप्रमाणे प्राधान्य मिळाले तर ते अधिक उमेदीने काम करतील. सध्या ते अल्प मानधनावर काम करीत आहेत. त्यांनी सनदशीर मार्गाने लढा द्यावा, असे आवाहन केले.
समान काम-किमान वेतन, सरळसेवा भरतीत 40 टक्के आरक्षण द्यावे, सुसूत्रीकरण रद्द करून तात्काळ बदली प्रक्रियेस मान्यता द्यावी, नोकरीची हमी देऊन विमा संरक्षण सुरु करावे, 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्याना पुनर्नियुक्ती मूल्यांकन अहवाल शिथिल करावा. 30 दिवसांची अर्जित रजा द्यावी, अशा मागण्या जिल्हाध्यक्ष पाताडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.




























































