आठवण पहिल्या दसरा मेळाव्याची; जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालणारी, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा मंत्र घेऊन मराठी लोकांच्या हक्कांसाठी, हिंदूसाठी, अडल्या-नडल्यांसाठी अखंड, अविरत कार्य करणाऱ्या शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थावर नुकताच पार पडला. मराठी माणसांशी नातेसंबंध प्रस्थापित होण्याची सुरुवात 30 ऑक्टोबर, 1966 ला झाली. अर्थात शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा, दिवस होता विजयादशमीचा.

‘स्वतःच्याच राज्यात स्वतःची चाललेली ससेहोलपट थांबविण्यासाठी प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाने या मेळाव्यास जातीने उपस्थित राहिलेच पाहिजे. पिचक्या पाठीच्या कण्याच्या माणसांनी या मेळाव्यास येऊ नये. ‘जय महाराष्ट्र’!’ असे प्रत्येकाचे रक्त सळसळवणारा हुंकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भरला. यानंतर मुंबईचे रस्ते मराठी माणसांच्या गर्दीने फुलून गेले. प्रत्येकालाच शिवाजी पार्कवर जायचं होतं. शिवसेनेच्या स्थापनंतरचं पहिलं शिलंगणाचं सोनं प्रत्येकाला लुटायचं होतं आणि त्यासोबत बाळासाहेबांचं भाषण ऐकायचं होतं.

शिवतिर्थावर झालेल्या पहिल्या दसरा मेळाव्याला लाखोंचा जनसागर उसळला होता. गर्दी एवढी होती की बसायलाही जागा नव्हती, तरीही लोकांचे जत्थेचे जत्थे येत होते. सायंकाळी साडेपाच वाजता सभा सुरू झाली. बाळासाहेबांसोबत रामराव आदिक आणि अन्य नेतेही होते. यावेळी लाखोंच्या जनसागरासमोर बाळासाहेबांनी पहिल्या भाषणात आपल्या विशेष ‘ठाकरी’ शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. त्यांचा प्रत्येक शब्द, वाक्य अंगार फुलवून जायचं, प्रत्येकातील ‘स्व’ जागा व्हायचा.

पुढे प्रत्येक दसरा मेळाव्याला बाळासाहेबांचे ‘ठाकरी’ शैलीतील भाषण ऐकण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळू लागला. ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… केवळ हे शब्द कानावर पडण्याचा अवकाश की; सारे वातावरण…भगवे…! ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा… विजय असो!!!’, ‘अरे आवाज कुणाचा…शिवसेनेचा!!!’ अशा गर्जनांनी आकाश दणाणून जावू लागले. क्षणार्धातच हा सगळा जल्लोष पुढे सुरु होणारे भाषण ऐकण्यासाठी शांतही होत असे. आजही बाळासाहेबांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने शिवसैनिक शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला जमतात.