
सामना प्रतिनिधी, नेर्ले/पेठ वडगाव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त भागातील शिवसेनेचे खासदार, आमदार, प्रशासन आणि इतर लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन जोपर्यंत पूरग्रस्तांची पूर्णपणे या संकटातून सुटका होत नाही तोपर्यंत मदत देणे सुरू ठेवणार असून, उद्या सकाळपासून जिल्हाप्रमुख आणि आमदारांमार्फत या साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्कनेते, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
दरम्यान, शिवसेनेतर्फे पाठविण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे तीन ट्रक आज पूरग्रस्त भागात दाखल झाले. सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त ठिकाणी जाऊन दिवाकर रावते यांनी देण्यात येणाऱया मदतीचा आढावा घेतला, यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना उपनेते, सांगली-सातारा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, सांगलीचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. सुजित मिणचेकर आदी यावेळी उपस्थित होते.
दिवाकर रावते म्हणाले, पूरग्रस्त भागामध्ये पन्नास फूट पाणी वाढले आणि लोकांच्या घरांचे दोन मजले पाण्याखाली गेले आहेत, संसार पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी लागेल ती सर्व मदत आम्ही पुरवत आहोत.
























































