
दादरमध्ये मेट्रो तसेच इतर विकासकामांमुळे अनेक बेस्ट थांबे मूळ बस थांब्यापासून 500 मीटर लांब नेण्यात आले होते. मात्र आता मेट्रो-3 मार्गाचे दादरमधील काम पूर्ण झाले असून पूर्वी बंद केलेले तसेच मूळ बस स्थानकाहून पुढे नेलेले थांबे पुन्हा पूर्ववत करा आणि प्रवाशांना दिलासा द्या, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास यांच्याकडे केली आहे.
शिवसेना भवनजवळील गोखले मार्ग (उत्तर) येथील दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या बससाठी बस थांबे मुंबई मेट्रो-3 चे काम सुरू असल्यामुळे बदलण्यात आले होते. त्यामुळे विभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. मात्र आता मेट्रो-3 चे काम पूर्ण झाले आहे. बेस्ट मार्ग पूर्ववत करण्यात आले तर त्याचा फायदा बेस्ट प्रवाशांसह मेट्रोच्या प्रवाशांनाही मिळणार आहे. त्यामुळे हे मार्ग सुरू करावेत, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांकडे पत्र लिहून केली आहे. हे पत्र शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बेस्टचे मुख्य व्यवस्थापक र. म. मडावी यांना दिले आणि सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळात माजी नगरसेविका प्रीती पाटणकर, शाखाप्रमुख प्रवीण नरे, दिनेश जैन आदी उपस्थित होते.