बाळासाहेब आणि माँसाहेब, आदित्य ठाकरे यांनी शेअर केला नाशिक अधिवेशनातील आठवणीचा फोटो

नाशिकमध्ये शिवसेनेचे आज राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. या महाअधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी युवासेनाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी समाज माध्यमांवर एक फोटो शेअर केला. “नाशिक अधिवेशनाची एक आठवण…” या मथळ्याखाली पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे दिसत आहे.

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पावन तपोभूमीतून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकसभेच्या लढाईचे रणशिंग फुंकण्यासाठी सज्ज झाली आहे. मंगळवारी म्हणजेच 23 जानेवारीच्या संध्याकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून राजकीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या अशा या घडामोडींकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. सातपूर येथील हॉटेल डेमॉक्रॉसी येथे महाअधिवेशन होणार आहे. यात राज्यभरातून आलेले प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत हे अधिवेशन होणार आहे. सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर शिवसेना पक्षाचा ध्वजारोहण सोहळा होणार आहे.