
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला त्यांच्या भाषेवरून फटकारले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खालच्या स्तारवरील आरोप करणे हा लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे, असा घणाघात त्यांनी केला. तसेच त्यांनी मिंध्यांनाही जबरदस्त टोला लगावला.
राज्यात कमालीची अस्थिरता आणि अशांतता आहे. बच्चू कडू रस्त्यावर उतरले आहेत. मनोज जरांगे यांनी आंदोलन केले. अनेक जातीचे लोकं रस्त्यावर उतरत आहेत. सरकारविरोधात रोष वाढत आहे. आंदोलन केल्यावर महाराष्ट्रात अॅनाकोंडा येणार आणि सांगणार की, दुर्बिणीतून बघायलाही विरोधक शिल्लक ठेऊ नका, ही त्यांची भाषा आहे. अशा प्रकारची भाषा ईदी अमीनने केली होती. त्यानंतर अशी भाषा भाजपवाले करत आहेत.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावेळी विखेपाटील यांना पाठवले, आता चंद्रशेखर बावनकुळे यांना चर्चेसाठी पाठवत आहेत. मुख्यमंत्री कधी शेतकऱ्यांना सामोरे जाणार, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी यांना पप्पू ठरवण्यासाठी भाजपने 30 हजार कोटी रुपये खर्च केले. पण राहुल गांधी ठामपणे स्वबळावर उभे आहेत. त्यांनी 100 जागा जिंकून आणल्या आहेत. तसेच ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते असून ते सत्ताधाऱ्यांच्या ढुंगणाखाली बुडबुडे काढत आहेत. राहुल गांधी हे लोकनेते आहेत. ते पप्पू नसून लोकनायक आहे. मोदी हे लोकनेते नाहीत. भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालेले मोदी आणि अमित शहा हे बुडबुडे आहेत. ते राहुल गांधी यांना घाबरत आहेत. तसेच आता ते आदित्य ठाकरे यांनाही घाबरत आहेत. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराचे जे प्रेझेन्टेशन केले, त्यामुळे त्यांची भीती आणखी वाढली आहे. त्यांनी जे मुद्दे मांडले, जे प्रश्न उपस्थित केले, त्यावर हे निरुत्तर झाले आहेत. त्यांनी जी कट्यार काढली ती त्यांच्या काळजात घुसली आहे. देशातील लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याला पप्पू म्हणणे हा लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे.
आता अॅनाकोंडा येत आहे. भाजप हा सर्वात मोठा अॅनाकोंडा आहे. हा अॅनाकोंडा काहीही गिळतो. भुखंड, विधानसभा, 40 आमदार, खासदार, देशाचे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, मरीन लाईन्सवरील भूखंड असे सर्व भाजपचा अॅनाकोंडा गिळतो. आता या अॅनाकोंडाला मुंबई गिळायची आहे , त्यामुळे या अॅनाकोंडापासून आपण सावध राहायला हवे. मिंधे हे अॅनाकोंडाचे पिल्लू आहे. हे पिल्लू पैशांनी भरलेले कंटेनर, ट्रक, टेम्पो गिळतो. हे पिल्लू बापाच्या सुरात सूर मिसळणारच, असा टोलाही त्यांनी लगवाला.





























































