सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधान टिकणार का? खणखणीत सवाल करत उद्धव ठाकरे गरजले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजयादशमी म्हणजे दसरा मेळाव्याच्या निमित्तानं निष्ठावंत शिवसैनिकांचा जनसागर वाजत-गाजत गुलाल उधळत शिवतीर्थावर जमला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद, उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा घोषणांनी आसमंत दूमदूमून सोडला. विराट… अतिविराट… अति अति विराट… असे शब्दही कमी पडतील इतका मोठा हा जनसागर शिस्तबद्ध पद्धतीनं जमला होता. अनेक वर्षांची परंपरा जपत हा दसरा मेळावा दणक्यात पार पडला. यावेळी मराठी आणि खऱ्या, कडव्या, शक्तीशाली हिंदू अस्मितेच्या विचारांचं सोनं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाटलं. उद्धव ठाकरे यांच्या तडाखेबंद भाषणानं जनसागरात मिंधे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच्या अत्याचाराच्या विरोधात लाटा उसळत होत्या. आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न, पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रश्न, न्यायालयात मिळणाऱ्या तारखांवर तारखा, मराठा-धनगर-ओबीसी आरक्षणाचे प्रश्न, आरोग्य यंत्रणांची भीषण अवस्था, शेतकऱ्यांचे होणारे हाल, धोक्यात आलेली लोकशाही अशा ज्वलंत मुद्द्यांना हात घालत महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मशाल पेटवली, त्याची धगधग समोर बसलेल्या शिवसैनिकांच्या प्रचंड प्रतिसादातून जाणवत होती.

शिवतिर्थावर मंगळवारी भगवा जनसागर उसळला होता. या अतिविराट जनसागरासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांची आणि भाजपची सालटी काढली. भाजपचे ढोंगी हिंदुत्त्वाचा बुरखा फाडत त्यांनी भाजपला उघडे पाडले. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर आमची जनता तुम्हाला या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशाराही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. मर्द कधीही विकला जात नाही लाचारी करणारे मर्द होऊ शकत नाही, अशी तोफ डागत उद्ध ठाकरे यांनी मिंध्याचा चांगलाच समाचार घेतला.

‘आज 57 वर्षे झाली, आपण परंपरा चालू ठेवली आहे. मोडता घालण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्या सर्वांना मोडीत काढत आपण आपली परंपरा जपली आहे. हा विराट मेळावा आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवत आहे. आज या मेळाव्यानंतर आपण खोकासूराचे दहन करणार आहोत. हा नवा असूर आहे. त्याचे दहन करण्याची वेळ आली आहे. रावण शिवभक्त होता. तरी तो माजला होता. त्यामुळे रामाने त्याला मारले. त्याने सीतेला चोरले होते. त्यामुळे रावणाचा अंत झाला. आता शिवसेना चोरणाऱ्या खोकासूराचे आपल्याला दहन करायचे आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘आता शिवसेना चोरण्याचा प्रयत्न होत आहे. आपला धनुष्यबाणही त्यांनी चोरला आहे. हनुमानाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती. तशी त्यांची खोक्यांची लंका जाळण्यासाठी जनता सज्ज आहे. आपच्याकडे काही कमळापसंदवाले आहेत. त्यांच्यात दोन हाफ आहे. आज देशात आणि राज्यात अनेक प्रश्न आहेत. आपण जरांगे- पाटील यांना धन्यवाद देत आहोत. त्यांनी शांतपणे आणि संमजसपणे आंदोलन सुरू ठेवले आहे. आता त्यांनी धनगरांनाही साद घातली आहे. राज्यातील जनरल डायर सराकरने शांततेने बसलेल्या आंदोलकांवर लाठीमार केला. आपण कधीही लाठीमाराचे आदेश दिले नाही. यामागील जनरल डायर शोधलाच पाहिजे’, असेही ते म्हणाले.

‘कोणत्याही जातीचे पोट असो, ते भरले गेले पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे. जातीपातीच्या भिंती उभ्या करून आपापसात लढवण्याचे कारस्थान भाजप करत आहे. त्या कारस्थांनांना पुरून उरत आपल्याला लढायचे आहे. भाजप हा कपटी शत्रू आपल्यासमोर आहे. ते विघ्नसंतोषी आहेत. ते कोणाच्याही लग्नात न बोलावता जातात, श्रीखंड, पुरणपोळी यावर ताव मारतात आणि जाताना नववधू- नवरदेव यांच्यात भांडण लावतात आणि पुढच्या लग्नात भांडण लावायला जातात, असे ते विघ्नसंतोषी आहेत. जनसंघ स्वातंतत्र्यलढ्यात नव्हता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळीही नव्हता. ते आले ते काहीतरी मिळवण्यासाठीच. ते जिथे गेले तिथे तोडफोड केली. जनता पक्ष त्यांनी फोडला. शिवसेना, अकाली दल यांच्यासोबतही तेच केले. भांडणे लावून ते निघून जातात. जनतेच्या घरात चूल पेटली नाही तरी आपल्यात भांडणे पेटवत ते त्यांची पोळी भाजून घेत आहेत’, असा हल्लाबेल उद्धव ठाकरे यांनी केला.

‘सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकाल्यानंतर गाल चोळत ते सांगतात, आम्ही आमचे नवीन वेळापत्रक सादर करू, असे सर्व चालले आहे. न्यायालयाकडून होणाऱ्या विलंबावरही त्यांनी गंमतीदार गोष्ट सांगत भाष्य केले. मात्र, आपण कोणाचाही, न्यायव्यवस्थेचाही अपमान करत नसल्याचे स्पष्ट केले. आता सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य, आपले संविधान आपली लोकशाही टिकणार आहे की नाही, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. केसचा निकाल लागण्याआधी निवडणुका घेऊन दाखवा, जनताच ठरवेल कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे’, असेही ते म्हणाले.

‘जे कुटुंबव्यवस्था मानत नाहीत, त्यांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही. मला माझ्या कुटुंबाचा, पूर्वजांचा, घराण्याचा अभिमान आहे. घराणेशाहीनर बोलता मग तुमच्या पक्षात असलेली घराणेशाही संपवा. कोण कोणत्या घराण्यातला आहे, परंपरा आहे. कोणसमोरही न झुकणार अशी नोंद व्हावी की सत्ताधाऱ्यांसमोर झुकणारा, काय ओळख व्हावी, हे आपल्या हातात असते. ज्याचा काही आगापिछा नाही, त्याच्या हातात देश दिला तर काय होते, याचे जर्मनी हे उदाहरण आहे. त्यांच्या देशात हिटलर झाला, याचे जर्मन लोकांना लाज वाटते. तुम्ही टाळ वाजवत बसा, मी झोळी घेऊन निघून जाणारा हवा की कणखर हवा, याचा विचार जनतेने करायचा आहे. देश बळकट करण्यासाठी स्थिर आणि मजबूत पक्ष पाहिजे, यासाठी त्यावेळी आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, बहुमतातील पाशवी सरकार नको, त्यामुळे आता भाजपचा पराभव करावाच लागेल. भाजपशिवाय मिलीजुली सरकार हीच आता देशाची गरज आहे. स्थिर पण पाशवी बहुमत नसलेले सरकार हवे.’

‘भाजपने दिलेली किती आश्वासने पूर्ण केली, यावर आता होऊ द्या चर्चा याची चर्चा करा. तुम्ही आमच्या लोकांना त्रास देताय, आमचे सरकार आल्यावर त्यांना उलटे टांगल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मर्द कधीही विकला जात नाही, मर्द कधीही खरेदी करता येत नाही. लाचारी असलेले कधीही मर्द होऊ शकत नाही. आज मिंधे आणि भाजप लाचार झालेले दिसत आहेत. भाजप सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र घेत सत्तेसाठी लाचार झाली आहे.’

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सूरत लुटली होती. आज सूरतमार्गे पळणारे महाराष्ट्राचे रक्षण काय करणार, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी आल्यावर आरे जमीन मेट्रोला दिली. बुलेट ट्रेनला जागा दिली. ती कोणाच्या फायद्याची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती. आज ते आपली मुंबई विकत आहे. मुंबई पालिकेच्या ठेवींवर त्यांचा डोळा आहे.’

‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडेल, त्यांचे तुकडे करू अशी घोषणा शिवसेनेने दिली आहे. त्यामुळे त्यांना मुंबई तोडता येत नाही. मुंबई तोडली तर जनता त्यांचे सरकार जाळून टाकेल, ही भीती त्यांना आहे. त्यामुळे मुंबईचा विकास नीती आयोगाच्या धर्तीवर करणार आहे. मुंबईचा पालकमंत्री बिल्डर केला आहे. हा मुंबई विकण्याचा, मुंबईचे खच्चीकरण करण्याचा डाव आहे. मुंबईची लूट यांनी चालवली आहे.’

‘कोरोना काळात मुंबईचे नाव जगभरात झाले होते. आता ते कोरोना काळातील भ्रष्टाचाराची चौकशी करत आहे. हा नतद्रष्टपणा आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी होती. आता मुंबईतील महत्त्वाची केंद्र मुंबईबाहेर नेत आहेत. आमच्या हक्काचे पळवून दुसरीकडे नेत असाल, तर याचा मातीत तुम्हाला गाडल्याशिवाय जनता राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबई बदनाम करण्याचे काम करत आहेत. शेण खाऊन दुसऱ्यांचे तोंड ते हुंगत आहेत.’

‘पीएम केअर घोटाळ्याची चौकशी आधी करा. जनतेच्या पैशांच्या हिशोब जनतेला द्या. आरोग्य सेवेचे यांनी वाटोळे केले आहे. ज्यावेळी दिल्लीतील त्यांचे दिल्लीतील सरकार थाळ्या बडवण्यास सांगत होते, त्यावेळी आम्ही जनतेला 5 रुपयांत भरलेली थाळी दिली. अशी जनतेची सेवा आम्ही केली. रिकाम्या थाळ्या बडवण्यापेक्षा भुकेलेल्यांना जेवण देण्याचे आमचे हिंदुत्व आहे.’

‘मंदिरे उघडण्याऐवजी आम्ही गावागावात आरोग्य केंद्रे उभी केली. कोणी आजाराने तळमळत असेल तर त्यांची जातपात धर्म विचारात न घेता त्यांना वाचवण्याचे काम आम्ही केले आहे. हेच आमचे हिंदुत्त्व आहे. त्यांचा मित्र त्याच्या घशात यांनी धारावी घातली आहे. त्यांच्या मित्रांचा विकास करण्यासाठी आम्ही हा विकास होऊ देणार नाही. धारावीचा विकास झाला पाहिजे, पण तिथे राहणाऱ्यांचा रोजगार आणि घरे वाचली पाहिजे. गिरणी कामगारांच्या मुलांनाही धारावाती घरे द्या, अशी आपली मागणी आहे. पोलिसांना घरे कमी पडत असतील तर त्यांनाही धारावीत घरे द्या. आम्हाला मुंबईतील मराठीचा ठसा अधिक गडद करायचा आहे. त्यांच्या मित्रांसाठी ते योजना आणत असतील तर त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही’, असा इशाराही त्यांनी दिला.

‘पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे असे स्वागत झाले की त्यांना आपण भारतात आले नसून भाजपात आल्यासारखे वाटत असेल, अशी तोफही त्यांना डागली. सीमेवर जवान मृत्युमुखी पडत असताना ते पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे स्वागत कसे करतात. शेतकरी, मराठा आंदोलक आत्महत्या करत आहे. कोणीही नादान सरकारसाठी आत्महत्या करू नये, असे आवाहनही त्यांनी केली. हाफकीन ही संस्थाही यांच्या मंत्र्यांना माहिती नाही. असे हे गद्दार त्यांच्या कर्मानेच जाणार आहे. त्यांच्या माथी असलेली गद्दार हा शिक्का कधीही पुसला जाणार नाही.’

‘मोगलांचा वरवंटा तोडून मोडून टाकणारे शिवतेज आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाले. महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना आता सोडायचे नाही. जाती-पाती धर्माच्या भिंती आम्हाला मान्य नाहीत. देशासाठी बलिदान देणारे कोणत्याही जातीधर्माचे असले तरी ते आमचेच आहे. मात्र, देशाच्या मुळावर येणारे कोणत्याही जातीचे असले तरी ते गद्दार आहेत. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रप्रेम आहे. देश वाचला तर महाराष्ट्र वाचेल, तरच आपण जनता वाचू, त्यासाठी आता आपल्याला लढायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.आमचे हिंदुत्व मातीशी जोडलेले आहे. वाघनखे जरूर आणा. त्याचे राजकारण करू नका, भावनेशी खेळ करू नका. भावनेशी खेळ कराल तर जनताच तुमचा कोथळा बाहेर काढेल’, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला.

‘निष्ठावंत भाजपवाल्यांना संतरज्या घालाव्या लागत असतील, त्यांची घराणे भाजप आणि संघासाठी झटली असतील ,तर त्यांना आजचा भाजप मान्य आहे काय, असा सवालही त्यांनी केला. आता सर्व मराठी जमतेला एकत्र करून आपली एकजूट करायची आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर महापालिकेसह विधानसभा निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत. मात्र, ते निवडणुकांना घाबरत आहेत. त्यामुळे आता आपल्याला त्यांचा पाडाव करावाच लागेल, आपल्या समोर मशाली आहेत. या आता हे दडपशाही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.