शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, खचून जाऊ नका! उद्धव ठाकरे यांनी दिला शेतकऱ्यांना धीर

967

तुम्ही आमचे अन्नदाते आहात. परिस्थिती दुर्दैवी असली तर खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओल्या दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना धीर दिला. संभाजीनगरातील कन्नड तालुक्यात कानडगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतेवेळी ते बोलत होते.

परतीच्या पावसाने मराठवाड्याला पुरते झोडपून काढले आहे. कापणीला आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना आधाराचे शब्द आणि धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे रविवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अस्मानी संकटाने उभं पीक जमीनदोस्त झालं. त्यात वीजेचं बील भरलं नाही तर वीजही कापली जाईल. तेव्हा जगणं आणखी कठीण होईल, असं म्हणत शेतकऱ्यांनी निकषांच्या फेऱ्यात न अडकवता मदत मिळावी अशी मागणी करणारं निवदेन उद्धव ठाकरे यांना केलं. या निवेदनाचा स्वीकार करून उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

ते म्हणाले की, मी इथे नेता म्हणून नाही, तर तुमचा कुटुंबीय म्हणून आलो आहे. हे संकट दुर्दैवी आहे. पण गेल्या चार पाच वर्षांपासून दुष्काळाशी केला तसाच सामना आताही आपण करू. फक्त तुम्ही आत्महत्येचा विचार करू नका. माझा शेतकरी मर्द आहे. कुणीही करणार नाही, असं धाडस तो करतो. तो याही संकटावर मात करेल. तुम्ही आमचे अन्नदाते आहात. तुम्हीच जगला नाहीत, तर आम्ही जगून काय करू? सरकार होईल तेव्हा होईल, पण आता तुमचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. या संकटात शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना धीर दिला.

अशा संकटकाळातही अनेक बँका कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवत आहेत. त्या परिस्थितीवर सज्जड इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी नैसर्गिक संकटाच्या कचाट्यात अडकला असताना जर तुम्ही त्यांना नोटिसा बजावत असाल, तर त्या नोटिसांना तर आम्ही जाळूच पण तुम्हालाही वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी बँकांना दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या