
लोकशाहीचे हे सरळसरळ हत्याकांडच आहे, अशा जळजळीत शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी ज्या तडकाफडकी रद्द करण्यात आली त्यावरून विरोधकांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केलेली असतानाच उद्धव ठाकरे यांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळसरळ हत्याकांडच आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात असून फक्त आता लढाईला दिशा द्यावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

























































