
सामना प्रतिनिधी, कोपरगाव
कोपरगाव शहरासाठी 49 कोटी रुपये खर्चाची पाणी योजना तातडीने कार्यान्वित करण्यात यावी अन्यथा कोपरगाव नगरपालिका कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना गटनेते योगेश बागुल यांनी दिला आहे.
कोपरगाव शहरासाठी 49 कोटीची पाणीपुरवठा योजना 95 टक्के पूर्ण झाली असून योजना तातडीने सुरू करावी जेणेकरून कोपरगाव शहराला एकाचवेळी एकसारखे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे सध्याच्या चार साठवण तलावाच्या समतेचा विचार करता शहराला 14 वेळेस पाणी देणे शक्य होणार आहे. यामुळे पाण्याची मोठी बचत होणार असुन लिकेजच्या नावाखाली होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चालाही आळा बसणार आहे. विशेष म्हणजे पंपिंग कालावधी कमी होऊन पंपिंगसाठी लागणाऱ्या विजेची मोठी बचत होणार आहे. या योजनेच्या ठेकेदारावर येसगाव साठवण तलाव ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत व तेथून नागरिकांच्या घरापर्यंत वॉटर मीटर जोडून पाणी आणून देण्याची जबाबदारी आहे. योजनेचे पाच टक्के काम शिल्लक असून पाण्याची हायड्रोलिक टेस्ट देणे बाकी आहे. परंतु नगराध्यक्ष वहाडणे हे त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात एवढेही काम पूर्ण शकले नाही. याबाबत आम्ही नगराध्यक्षांना पत्रही दिले होते. त्यात पाण्याची ट्रायल व टेस्टिंग झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला बिल अदा करू नये असे स्पष्ट नमूद केले होते. परंतु नगराध्यक्षांनी काम पूर्ण करून घेताच ठेकेदाराचे बिल अदा केले. ठेकेदाराचे बिल अदा केले नसते, तर त्या ठेकेदाराकडून योजनेचे काम पूर्ण करून घेता आले असते. आज शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न काही अंशी कमी झाला असता, पंपिंग चा कालावधी कमी होऊन विजेची मोठी बचत झाली असती एकाच वेळी संपूर्ण शहराला पूर्ण दाबाने पाणी देऊन पाणी बचत ही मोठ्या प्रमाणात करता आली असती आज असलेल्या चार साठवण तलावाची क्षमता विचारात घेता योजनेमुळे 14 वेळेस शहराला पाणी देता आले असते.
नांदूर मधमेश्वर ते कोपरगाव बंद पाइपमधून पाणी आणण्याची 89 कोटीची योजना दारणा धरणावरील 80 टक्के आरक्षणामुळे तसेच लोकसहभागाचे नऊ कोटी देण्याची कोपरगाव पालिकेची क्षमता नसल्यामुळे ही योजना बारगळली. निळवंडे शिर्डी पाणी योजना होत असल्याची माहिती मिळाल्याने या संधीचा फायदा घेत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी साईबाबा संस्थांच्या मदतीने तसेच मुख्यमंत्री, जलमंत्री यांच्या सहकार्याने व सातत्याने पाठपुरावा करून या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर परवानगी मिळवून योजना महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करून घेतली. या योजनेचा खर्च साईबाबा संस्थान करणार असल्याने कोपरगाव नगरपालिकेला कुठल्याही प्रकारची आर्थिक झळ नगरपालिकेला सोसावी लागणार नव्हती. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागणार होता. हे समजल्यामुळे काही लोकांच्या पोटात गोळा उठला, त्यामुळे या योजनेत विविध प्रकारे खोडा घालण्याचे काम सुरू झाले काही महाभागांनी तर थेट उच्च न्यायालयापर्यंत उलटे सुलटे दावे दाखल केले असा आरोप यावेळी करण्यात आला.
कालच्या दुरावस्थेमुळे कित्येक वर्षापासून पाटबंधारे खात्याकडून टेन टू हेड या पद्धतीने पाणी वाटप केले जाते असे असतानाही पाटबंधारे खात्याने कोपरगाव शहराच्या दुसऱ्या पाणीटंचाईची अवस्था लक्षात घेऊन सुरुवातीलाच शहराला एक वेळेस पुरेल इतके पाणी तळ्यात भरून दिले होते. असे असतानाही नगराध्यक्ष यांनी कालव्याचे कुलूप तोडण्याची नौटंकी केली. आजपर्यंत अनेक नगराध्यक्ष होऊन गेले, परंतु तळी भरण्याचे काम अधिकारी व कर्मचारी करीत असतात. मात्र वाढणे यांनी वहाडणे यांनी तळ्यावर केलेला मुक्काम सवंग लोकप्रियतेसाठी असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न एवढा गंभीर असताना पाच नंबर साठवण तलावाच्या खोदकामाबाबत नगराध्यक्ष यांनी कुठल्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता स्वतःच बोलणी केली आधी होकार नंतर नकार अस असल्याचे यांनीच सोशल मीडियावर सांगितले गायत्री कंपनीने नकार दिला असल्याचे पालिकेला दिलेले नकार पत्र पंधरा दिवस यांनी जनतेपासून दडवून ठेवले व दबावापोटी गायत्री नकार दिल्याचा कांगावा करून नेहमीप्रमाणे जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणी प्रयत्न केला आहे.
झाले ते झाले नौटंकी बंद करा
पाण्याचे राजकारण करू नका, झाले तेवढे वाटोळे पुरे झाले शुल्लक स्वार्थासाठी कोपरगाव शहराचा खेळ करू नका, शहराच्या पाण्याची काळजी होती. तर दोन महिने अ अगोदरच व्यवस्था का केली नाही.? येणाऱ्या पाण्यात तलाव भरल्यानंतर 49 कोटीच्या पाणी योजनेची ट्रायल व टेस्टिंग घ्या योजना कार्यान्वित करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय शिवसेना राहणार नाही असा इशारा शिवसेनेच्या वतीने गटनेते योगेश बागुल यांनी दिला. या पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या कारभारावर शिवाय शिवसेनेच्या नगरसेवकांनी चौफेर आरोपाच्या फैरी झाडत कडाडून टीका केली. या चर्चेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, आरोग्य सभापती कालूआप्पा आव्हाड, शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ, पप्पू पडियार, राहुल शिंदे, रवी कथले, सिद्धार्थ शेळके यांनी भाग घेतला.




























































