शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात सामाजिक उपक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी रोजी असलेल्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मालाड विधानसभा क्षेत्र आणि शिवस्नेही प्रज्ञा-प्रबोधन संस्थेच्या वतीने प्रबोधन विद्या निकेतन शाळेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी वत्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्री राम मंदिर उभारणीस शिवसेनाप्रमुखांचा सहभाग’ आणि ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी समाजासाठी केलेले कार्य’ या विषयावर नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेच्या घनकचरा विभागातील स्वच्छता कामगारांना ब्लँकेट, मास्क, साबण यांचे कीट देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक विधानसभा प्रमुख अशोक पटेल यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सहकार्यवाह विजय मांडाळकर, मुख्याध्यापिका प्रविणा वाडेकर, हर्षदा राऊत, नीलम माने मेहनत घेत आहेत.

अंधेरीत ‘कार्यसम्राट चषक’ला सुरुवात

दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख व अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम आणि विधानसभा समन्वयक सुनील खाबिया जैन यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले क्रीडांगण, डी.एन. नगर येथे आयोजित ‘अंधेरी महोत्सव – 2024’ या कार्यक्रमाची सुरुवात आज ‘कार्यसम्राट चषक – 2024’ या क्रिकेट स्पर्धेने झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भारतीय कामगार सेना महासंघाचे चिटणीस नीलेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. 19 ते 21 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अंधेरी पश्चिम विभागातील 40 क्रिकेट संघांना प्रवेश दिला आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला एक लाख रुपये रोख व कार्यसम्राट चषक तर उपविजेत्या संघाला 50 हजार रुपये रोख व चषक अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. दक्षिण रायगड जिल्हा संपर्क संघटक ज्योत्स्ना दिघे, विधानसभा संघटक विना टॉक उपस्थित होते.

दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 तर्फे विविध कार्यक्रम

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 21 जानेवारीला साहेब चषकअंतर्गत शिवसेना शाखांच्या संघाचे क्रिकेट सामने मरिन ड्राईव्हच्या इस्लाम जिमखाना येथे होईल. विधानसभेतील महिला आणि पुरुष संघाचे क्रिकेटचे सामने याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता हिंदू जिमखाना येथे होतील. 27 जानेवारीला रिंग फुटबॉल स्पर्धा रिगल सिनेमासमोरील बॅक गार्डन येथे तर 28 जानेवारीला विविध खेळांच्या स्पर्धा मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन येथे होतील.

शाखा क्र. 227 तर्फे 21 जानेवारीला गीता नगर, कुलाबा येथे चित्रकला स्पर्धा आणि 26 जानेवारीला कुलाब्यातील प्रसिक नगर सोसायटी शाळेत खाऊ वाटप करण्यात येईल. शाखा क्र. 224 तर्फे 20 जानेवारीला जनाबाई आणि माधवराव रोकडे म्युनिसिपल शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, 26 आणि 27 जानेवारीला ओव्हर आर्म स्पर्धा, 28 जानेवारीला मांडवी खाद्य महोत्सव आयोजित केला आहे. शाखा क्र. 213 तर्फे 20 जानेवारीला वृक्षारोपण आणि 27 जानेवारीला शाखेत आरोग्य शिबीर भरवण्यात येईल. शाखा क्र. 220 तर्फे 26 जानेवारीला शाखेत चित्रकला स्पर्धा तर शाखा क्र. 218 तर्फे 21 जानेवारीला वैद्यकीय शिबीर आयोजित केले आहे. शाखा क्र. 216 तर्फे 21 आणि 22 जानेवारीला अंडर आर्म क्रिकेटचे सामने आणि 26 जानेवारीला आयुष्मान भारत कार्ड वाटप करण्यात येईल.

21 जानेवारीला शाखा क्र. 225 मध्ये रक्तदान शिबीर आणि म्युनिसिपल शाळा कुलाबा येथे व्याख्यानमाला आयोजित केली आहे. शाखा क्र. 221 तर्फे 26 जानेवारीला मुंबादेवी मंदिरजवळ रक्तदान शिबीर आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे.  27 आणि 28 जानेवारीला जांभुळवाडी, काळबादेवी येथे क्रिकेटचे सामने होतील. शाखा क्र. 217 तर्फे 25 जानेवारीला खेतवाडीच्या आश्रम अभ्यासिका येथे 101 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. शाखा क्र. 214 तर्फे 27 जानेवारीला शिवसेना महालक्ष्मी शाखेजवळ ब्लँकेट वाटप आणि शाखा क्र. 219 तर्फे 21 आणि 28 जानेवारीला एस. एम. क्रीडांगण येथे क्रिकेटचे सामने होतील. शाखा क्र. 222 तर्फे 23 जानेवारीला अल्पोपाहार वाटप, 27 जानेवारीला आयुष्मान भारत कार्ड वाटप स्थानिक शाखेत होईल. 20 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता उद्यान व्याख्यानमाला ठाकुरद्वार येथील बँक्वेट हॉल येथे होईल.