शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाला अखेर सुरुवात; कोल्हापुरात प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर टिकेची झोड

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढलेली ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. ही वाघनखे सातारा, नागपूरनंतर महिनाभरापूर्वी कोल्हापुरात दाखल झाली होती. पण मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळाला नसल्याने अखेर सकाळी घाईघाईत उद्घाटनाचे शासकीय सोपस्कार पार पाडण्यात आले.

या शिवशौर्य शस्त्रगाथा प्रदर्शन उद्घाटनासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर वगळता मान्यवर उपस्थित नसल्याने व्यासपीठावरील खुर्च्या काढण्यात आल्या. तर व्यासपीठासमोरील मोकळ्या खुर्च्या भरण्यासाठी शेजारच्या कॉलेजमधून विद्यार्थ्यांना अक्षरशः प्रॅक्टिकल सोडून जबरदस्तीने कार्यक्रमासाठी बसवण्याची नामुष्कीजनक वेळ प्रशासनावर आली. त्यात हा कार्यक्रम लोकाभिमुख करणे अपेक्षित असताना कोल्हापूरकरांनादेखील निमंत्रण नसल्याने खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही ऑनलाईन हजेरीच लावणे पसंद केले. एकंदरीत सांस्कृतिक संचालनालय विभागासह पुरातत्व विभागाच्या गलथान कारभारावरून टिकेची झोड उठू लागली आहे.

बहुचर्चित ऐतिहासिक वाघनख्यांच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त मिळाला. कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळावरील लक्ष्मी विलास पॅलेस येथे गेल्या महिन्यात 28 सप्टेंबरला ही वाघनखे आणण्यात आली आहेत. मात्र, उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने ही वाघनखे कधी पाहायला मिळतील याची शाश्वती नसल्याने, काही विद्यार्थ्यांना परत फिरावे लागले होते; पण आज अचानक उद्घाटनाचा घाट घालण्यात आला. वेळेत बदलही करण्यात आला.त्यानुसार ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शन आणि लंडनच्या व्हिक्टोरिया ऍण्ड अल्बर्ट संग्रहालयातून आणलेली ‘वाघनखे’ याचे उद्घाटन सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना ऐनवेळी सांगण्यात आल्याने त्यांची चांगलीच धावपळ उडाली. मंत्री हसन मुश्रीफ हे कॅबिनेट बैठकीसाठी रात्रीच मुंबईला रवाना झाले असून, जिह्यातील महायुतीचा एकही खासदार आणि आमदार यावेळी उपस्थित नव्हता.

माईकचा आवाज ‘गायब’
राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती बोलत असताना माईकचा आवाजच आला नाही. त्यामुळे ते काय बोलले हे कोणाला समजले नाही. त्यात आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे व्यासपीठावरून भाषण करताना त्यांच्याही माईकची समस्या दिसून आली. पुरातत्व आणि सांस्कृतिक विभागाच्या या ढिसाळ आणि गचाळ नियोजनशून्य कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, पालकमंत्री आबिटकर यांनी हा कार्यक्रम औपचारिक असल्याचे सांगत, सोमवारनंतर सर्वांसाठी व्यवस्थित नियोजन केले जाईल, असे सांगितले. तसेच नियोजनात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. या कार्यक्रमात पुरातत्व आणि सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी एकूणच कार्यक्रमाविषयी माहिती दिली. मात्र, ढिसाळ नियोजनाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ‘हात जोडत’ त्यांनी पळ काढला.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जबरदस्ती आणले
या संपूर्ण कार्यक्रमात पुरातत्त्व विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभार पाहायला मिळाला.आयोजकांना स्टेजवरच्या खुर्च्या कमी कराव्या लागल्या. दुसरीकडे प्रेक्षकांच्या रिकाम्या खुर्च्यांवर बसण्यासाठी महाविद्यालयाच्या मुलांना जबरदस्तीने बोलावून आणले. काही विद्यार्थी प्रदर्शन पाहत असताना त्यांना सुरक्षा यंत्रणांनी अक्षरशः बाहेर हाकलून दिले. प्रसारमाध्यमांनाही मज्जाव करण्यात आल्याने काही काळ गोंधळ उडाला. या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांना निमंत्रित करण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.