
भाजपचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये महिला असुरक्षित आहेत, तशीच परिस्थिती महाराष्ट्रातही असल्याचे दिसून आले आहे. मिंधे सरकारच्या काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यातून रोज 18 ते 25 वयोगटातील सरासरी 70 महिला बेपत्ता होत आहेत. गेल्या तीन महिन्यांत तब्बल साडेपाच हजारांपेक्षा जास्त मुली गायब झाल्या आहेत. राज्य पोलिसांकडून महिला आयोगाला दिलेल्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे.
राज्यात महिलांसंदर्भातील गुन्हे व संबंधित बाबींचा अहवाल दर तीन महिन्यांनी पोलीस प्रशासनाकडून राज्य महिला आयोगाला दिला जातो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा तीन महिन्यांचा अहवाल आयोगाला नुकताच सादर झाला. त्यात मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या घटनांचा आकडा मोठा आणि चिंताजनक आहे. मुली आणि महिलांना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढल्याने ते रोखण्याचे आव्हान पोलीस दलासमोर उभे राहिले आहे. बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींचा शोध न लागणे ही बाबही गंभीर असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त होत असून राज्याचे गृहखाते आणि सरकार काय करतेय, असा सवाल केला जात आहे.
विशेष पथक नेमून बेपत्ता मुलींचा शोध घ्या – रूपाली चाकणकर
राज्यात इतक्या मोठय़ा प्रमाणात मुली व महिला बेपत्ता होणे ही चिंताजनक बाब असून राज्य सरकारने विशेष पथक नेमून या महिला व मुलींचा शोध घ्यावा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत. ट्विटरवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट केली आहे. हरवलेल्या व्यक्तींच्या बाबतीत 2020 पासून देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे हे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. या घटना रोखण्यासाठी पावले उचलली जात नाहीत, प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग सेल आहे, पण तो कार्यरत आहे की नाही याचाही आढावा घेतला जात नाही, असेही त्या म्हणाल्या.
लग्न, प्रेम, नोकरीच्या आमिषाने लैंगिक अत्याचार
एखादी महिला किंवा मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर तिचा शोध तातडीने लागला नाही तर अशा स्त्रिया मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढल्या जातात. लग्न, प्रेम किंवा नोकरीच्या आमिषाने दिशाभूल करून त्यांच्यावर अत्याचार केले जातात. लग्नाचे आमीष, प्रेमाचे आमीष आणि नोकरीचे आमीष दाखवून या मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात, असेही चाकणकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
शासनाला बेपत्ता मुलींबद्दल प्रश्न पडत नाही का? सुप्रिया सुळे यांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुलींची दिशाभूल करून त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर काही उपाययोजना होत आहेत का? असा सवाल त्यांनी ट्विटरवर केला आहे. महिलांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि तज्ञांची मते घेऊन हे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन यावर काम करावे, असेही मत त्यांनी मांडले आहे.
सर्वाधिक मुली पुण्याच्या ग्रामीण भागातल्या
बेपत्ता झालेल्या मुली आणि महिला या सर्वाधिक पुणे येथील आहेत. मार्च महिन्याची आकडेवारी पाहिली तर पुण्यातून 2258 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर नाशिक 161, कोल्हापूर 114, ठाणे 133, नगर 101, जळगाव 81 तर सांगलीतून 82 मुली अचानक बेपत्ता झाल्या आहेत. ग्रामीण भागांतील मुलींचे प्रमाण यात अधिक आहे.
राज्यात इतक्या मोठय़ा प्रमाणात मुली व महिला बेपत्ता होणे ही चिंताजनक बाब असून राज्य सरकारने विशेष पथक नेमून या महिला व मुलींचा शोध घ्यावा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत.
महिना बेपत्ता मुली
जानेवारी 1600
फेब्रुवारी 1810
मार्च 2200

























































