
राजधानी दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचे विमान खराब हवामानात सापडले होते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी वैमानिकाने पाकिस्तानकडे त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी मागितली, मात्र पाकिस्तानने नकार कळवल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) आज सांगितले. 21 मे रोजी श्रीनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केल्याने 227 प्रवाशांचा जीव वाचला. अचानक जोरदार धक्क्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.
संबंधित विमानात असलेल्या कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. विमानाच्या पुढील भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून विमानात गडबड झाल्याच्या घटनेची चौकशी सुरू आहे. पायलटला गोंधळ जाणवला असता त्याने लाहोर एअर ट्रफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि खराब हवामानामुळे पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी मागितली. परंतु लाहोर एटीसीने पायलटला स्पष्टपणे नकार दिला, ज्यामुळे विमानाला त्याच्या नियोजित मार्गावर पुढे जावे लागले, असे डीजीसीएने निवेदनात म्हटले. पायलटने श्रीनगर एअर ट्रफिक कंट्रोलला माहिती दिली आणि विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले.