
डॉक्टर रुग्णांना जीवदान देतात. त्यामुळे त्यांना देवाचे रुप मानण्यात येते. मात्र, काहीवेळा डॉक्टरांकडून झालेल्या चुकांचा भुर्दंड रुग्णांना आयुष्यभर भोगावा लागतो. अशीच एक घटना ऑस्ट्रियामध्ये घडली आहे.
ऑस्ट्रियातील फ्रीस्टँड क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरांकडे 82 वर्षाचे वृद्ध रुग्ण तपासणीकरिता गेले होते. त्यांना डाव्याला पायाला वेदना होत असल्याने डाव्या पायाची शस्त्रक्रिया करायला डॉक्टरांनी सांगितले. मात्र, डॉक्टरांनी डाव्याऐवजी उजव्या पायाची शस्त्रक्रिया करून रुग्णाचा उजवा पाय कापला. दुसऱ्या दिवशी नर्स या वयोवृद्ध रुग्णाचं ड्रेसिंग करायला गेली तेव्हा डॉक्टरांकडून झालेली चूक तिच्या लक्षात आली.
ड्रेसिंग करायला आलेल्या नर्सच्या चूक लक्षात आल्यावर तिने क्लिनिकमधील उच्च अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयाने आपली चूक मान्य केली. डॉक्टरकडून झालेल्या या चुकीमुळे रुग्णाला त्याचा चांगला पाय गमवावा लागला. चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांची पायाची समस्याही सुटली नाही. त्यामुळे आता त्यांचा डावा पायसुद्धा गुडघ्याखालून कापावा लागणार आहे. या चुकीबाबत झालेल्या नुकसानाची भरपाई रुग्णालय देणार आहे, असे रुग्णालयाने सांगितले आहे.
ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी रुग्णाच्या चुकीच्या पायावर खूण केली. यामुळे ज्या पायावर खूण होती त्या पायाचं ऑपरेशन डॉक्टरने केलं. तरीही डॉक्टरांकडून एवढी मोठी चूक कशी झाली, याची चौकशी सुरू आहे. डॉक्टरांच्या चुकीचा भुर्दंड मात्र रुग्णाला आता यापुढे आयुष्यभर भोगावा लागणार आहे.






























































