लालबागमध्ये हादरवणारी घटना; मुलीची हत्या करून बापाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लालबागमध्ये पुन्हा हादरविणारी घटना आज घडली. 42 वर्षीय वडिलांनी आपल्या 11 वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. काळाचौकी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले ते चिठ्ठीत नमूद असल्याचे सूत्रांकडून समजते.

गेल्या महिन्यात लालबागमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली होती. मुलीनेच आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे करून ते तीन महिने घरात लपवून ठेवले होते. ही घटना ताजी असतानाच आज लालबागच्या गणेशगल्लीत दुर्दैवी घटना घडली. गणेशगल्लीतल्या विमावाला महल या इमारतीत राहणाऱ्या भूपेश पवार (42) याने टोकाचे पाऊल उचलले. घरात कोणी नसताना भूपेशने त्याच्या 11 वर्षांच्या मुलीला गळफास लावून स्वतःलाही गळफास लावून घेतला. यात दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी हत्या आणि अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. भूपेशचा आज सकाळी त्याच्या पत्नीसोबत वाद झाला होता. पत्नी कामाला निघून गेल्यानंतर भूपेश आणि त्यांची मुलगी दोघेच घरात होते. अकराच्या सुमारास पत्नीने भूपेशला फोन केला, पण भूपेशकडून फोन उचलला जात नसल्याने पत्नी भाग्यश्री घरी गेली. तेव्हा दरवाजा आतून बंद आढळला. बराच वेळ प्रयत्न करूनही दरवाजा उघडला जात नसल्याने भाग्यश्री यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा उघडला असता भूपेश आणि त्यांची मुलगी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी पोलिसांना भूपेशने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली आहे. काळाचौकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.