वाढत्या कोरोनामुळे ‘मनोरंजनाची फॅक्टरी’ पुन्हा एकदा थंडावली, जिल्हाधिकाऱ्य़ांच्या आदेशानंतर साताऱ्य़ात शूटिंग बंद

मराठी व हिंदी चित्रपट, तसेच मालिकांच्या चित्रीकरणासाठी पहिल्या पसंतीचे डेस्टिनेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा सातारा जिह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध मालिका, चित्रपट आदींचे चित्रीकरण जिल्हाधिकाऱ्य़ांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे. परिणामी, ‘मनोरंजनाची फॅक्टरी’ पुन्हा एकदा थंडावली आहे.

सातारा जिल्ह्याला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले असून, चित्रीकरणासाठी अनेक खास लोकेशन्स जिल्ह्यात आहेत. तसेच कलाकार, तंत्रज्ञ व आवश्यक सुविधा माफक खर्चात उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक चित्रीकरणासाठी सातारा जिल्ह्याला  प्रथम पसंती देत असतात. मात्र, गतवर्षी कोरोनाचे थैमान सुरू झाल्यापासून संपूर्ण चित्रपटसृष्टी संकटात सापडली. चित्रपटनिर्मिती तर जवळजवळ थांबलीच. तथापि, काही मालिकांच्या सुरू असलेल्या चित्रीकरणातही अडथळे आले.

सातारा जिह्यातच चित्रीकरणादरम्यान कोरोनाची लागण होऊन ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सेटवर अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. शेवटी प्रशासनाने चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणावर बंदी घातली. कालांतराने परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांचा विचार करून शासनाने काही नियम व अटी घालून चित्रीकरणास परवानगी दिली होती. तेव्हापासून जिह्यात ‘देवमाणूस’, ‘मुलगी झाली हो’, ‘घेतला वसा टाकू नको’, ‘आई माझी काळूबाई’ अशा चार मालिकांचे चित्रीकरण आवश्यक ती काळजी घेऊन सुरू होते. ‘एक झटका’ या चित्रपटाचे, तसेच अनेक वेबसीरिज, शॉर्ट फिल्म्स यांचे चित्रीकरण सुरू होते; पण आता पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेची तीक्रता आधीपेक्षा अधिक आहे. जिह्याचा दररोजचा रुग्णवाढीचा आकडा हजारांच्या वर गेला आहे. मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे. त्या पाश्वभूमीवर सर्व चित्रीकरण थांबविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्य़ांनी जारी केला आहे. त्यामुळे सर्वच चित्रीकरण ठप्प
झाले आहे.

कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिह्यात चित्रपट, मालिका, वेबसीरिज, शॉर्ट फिल्म्स यांचे चित्रीकरण सुरू होते. कोरोनाचे संकट निश्चितपणे भयंकर आहे; पण अशा संकटाच्या काळातही लोकांचे मनोरंजन करून त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम रुपेरी पडदा, छोटा पडदा करीत असतो. त्यामुळे चित्रीकरण विनाअडथळा सुरू राहणे आवश्यक आहे. कोरोना संकटामुळे चित्रपट उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले असून, निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांची मोठय़ा प्रमाणात कुचंबणा होत आहे. त्यामुळे सरकारने नियम, अटी घालून पूर्वीप्रमाणेच चित्रीकरणाला परवानगी द्यावी. – महेश देशपांडे, सातारा शाखाप्रमुख, अ. भा. चित्रपट महामंडळ.

आपली प्रतिक्रिया द्या