
देशातील आघाडीचे ई-कॉमर्स मार्पेटप्लस असलेल्या फ्लिपकार्टने आता फ्लिपकार्ट कॅमेऱयाच्या सहाय्याने ऑनलाइन खरेदीची संधी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. फ्लिपकार्टच्या अॅपवर फ्लिपकार्ट कॅमेऱयाचा नवा फिचर्स असेल. त्या आधारे खरेदीदारांना कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती वास्तवात कशी असेल हे कळू शकणार आहे. फ्लिपकार्टने बुधवारी या नव्या फिचर्सची घोषणा केली.
ग्राहकांना फ्लिपकार्ट कॅमेऱयाचा उपयोग करून कुठल्याही उत्पादनाची ‘3 डी’ इमेज प्राप्त करता येणार आहे. फर्निचर, लगेज तसेच इतर मोठय़ा उपकरणांच्या खरेदीवेळी उत्पादनांचा आकार आणि स्वरूप याचे आधीच नेमके चित्र पाहायला मिळेल व त्याचा ग्राहकांना वस्तूची निवड करताना मोठा फायदा होईल. कोरोना महामारीच्या काळात ग्राहकांना घराबाहेर न पडताच योग्य उत्पादन खरेदी करता येईल, असा दावा फ्लिपकार्टचे मुख्य उत्पादन आणि तंत्रज्ञ अधिकारी जयंद्रन वेणुगोपाल यांनी केला आहे. ग्राहकांना आपल्या स्मार्टफोनवर केवळ क्यूआर कोड स्कॅन करून फ्लिपकार्ट कॅमेऱयाची सुविधा उपलब्ध करता येणार आहे.
























































