सहकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून व्यापारी बनला नक्षलवादी!

640

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात एक व्यापारी सहकारी व्यापाऱ्यांच्या आर्थिक -मानसिक त्रासाला कंटाळून नक्षल चळवळीत दाखल झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तसेच त्याने सहकारी व्यापाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देत बदला घेण्याची चिठ्ठी व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात एटापल्ली व्यापारी संघ नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमधील ही घटना पोलीस आता गांभीर्याने घेत आहेत. धमकीची आणि ठार मारण्याची चिठ्ठी पोस्ट करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव राम मिर्धा आहे. राम मिर्धा याने एटापल्ली शहरातील पाच व्यापारी आपल्याला आर्थिक, मानसिक त्रास देत असून त्यांच्यामुळे आपण उध्वस्त झालो आहोत, असे चिठ्ठीत नमूद केले आहे. या व्यापाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण नक्षल चळवळीत दाखल झालो असून आपण या व्यापाऱ्यांना सोडणार नाही, असेही त्याने म्हटले आहे. हा व्यापारी परिसरातून बेपत्ता झाला आहे. त्याच्या भावाने यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर चिठ्ठीत नावे असलेल्या पाच व्यापाऱ्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही तक्रारी दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे या व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष होता. त्यामुळे राम मिर्धाने नक्षल चळवळीत दाखल होण्याचा निर्णय घेतला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या