रवींद्र नाट्यमंदिरवाल्यांनी नाटकाचा मुडदा पाडला, शॉर्टसर्किटमुळे आग; ‘अश्रूंची फुले झाली’च नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रभादेवीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रवींद्र नाट्यदिराच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा अनुभव पुन्हा एकदा नाट्यकलावंत आणि प्रेक्षकांनी घेतला. रविवारी रवींद्र नाट्यमंदिरात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक रद्द झाले. यामुळे नाटक बघण्यासाठी दूरदूरवरून आलेल्या प्रेक्षकांची घोर निराशा झाली. प्रेक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यानिमित्ताने नाट्यगृहांच्या सोयीसुविधा आणि मेंटनन्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

‘अश्रूंची झाली फुले’ या अजरामर नाट्यकृतीचे फक्त 51 प्रयोग होणार आहेत. त्यामुळे हे नाटक कधी लागतंय याच्या प्रतीक्षेत नाटय़रसिक असतात. रवींद्र नाट्यमंदिराच्या शनिवारच्या प्रयोगालाही प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र नाटय़गृहात शॉर्टसर्किट झाले आणि प्रयोग झालाच नाही. याआधीही एका कार्यक्रमादरम्यान नाटय़गृहात अशी घटना घडली होती. राज्य सरकारतर्फे चालवणाऱया जाणाऱया नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार पुन्हा उघड झाला. नाटय़गृहाचे मेंटनन्स सुधारावे, अशी अपेक्षा रसिक करीत आहेत.

इथे कार्यक्रम करण्यात अर्थ नाही – सुबोध भावे
फायर इक्विपमेंटचे सगळे ऑडिट झाल्याशिवाय आम्ही सांगणार नाही की तुम्ही प्रयोग करा. तुमच्या जबाबदारीवर प्रयोग करायचा असेल तर करा, असे शॉर्टसर्किटच्या घटनेनंतर सुबोध भावे यांना सांगण्यात आले. ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकाचा शो हाऊसफुल्ल होता. ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने आले होते. पुन्हा काही घडले असते तर धावपळ झाली असती. सर्वांचा जीव महत्त्वाचा होता. त्यामुळे मी प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे भावे म्हणाले. जोपर्यंत तिथली यंत्रणा नीट होत नाही तोपर्यंत तोपर्यंत इथे कार्यक्रम करण्यात अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया भावे यांनी दिली.

तावडेसाहेब, हा ‘विनोद’ नव्हे!
रवींद्र नाटय़मंदिर ही सरकारी बजबजपुरी बनली आहे. सगळाच सावळागोंधळ आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यापर्यंत अनेकदा लेखी-तोंडी तक्रारही केली आहे. मात्र मंत्री तावडे यांनी या प्रकाराकडे ‘विनोद’ समजून कानाडोळा केला असावा, अशी सणसणीत प्रतिक्रिया एका निर्मात्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

नाटय़गृहांचे मेंटनन्स चिंतेचा विषय – अजित भुरे
रवींद्र नाटय़मंदिरात रविवारी घडलेली घटना हा अपघात होता. तो व्हायला नको होता, पण नाटय़गृहांच्या मेंटनन्सबाबतील सांगायचे तर निराशाजनक स्थिती आहे. हा केवळ एकाच नाटय़गृहाचा प्रश्न नाही, राज्यभरातील नाटय़गृहांचा प्रश्न आहे. नाटय़गृहांचे मेंटेनन्स निश्चितपणे होत नाही ही वस्तुस्थिती आहे. नाटय़गृहांच्या मेंटनन्ससंदर्भात निर्माता संघाने सांस्कृतिकमंत्र्यांना महिनाभरापूर्वी निवेदन दिलेले आहे. त्यांनीही लक्ष घालू असे आश्वासन दिले आहे. लवकरच त्यांची भेट घेणार आहोत, असे निर्माता संघाचे अध्यक्ष अजित भुरे यांनी सांगितले.

नुकसान कोण भरून देणार?
रवींद्र नाटय़मंदिरात रविवारी रात्री 8.30 वाजता ‘हॅटस् ऑफ पंचमदा’ हा संगीतमय कार्यक्रम होता. शॉर्टसर्किटमुळे हा कार्यक्रमही रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली. या कार्यक्रमांची तिकिटे ‘बुक माय शो’ या वेबसाइटवरून बुक झाली होती. बुक माय शो वरून बुक होणाऱया तिकिटांवर जीएसटी आणि सर्व्हिस चार्ज आकारला जातो. शो रद्द झाल्यामुळे प्रेक्षकांना तिकिटांची पूर्ण रक्कम परत द्यावी लागणार आहे. मात्र प्रत्येक तिकिटावर जीएसटी आणि सर्व्हिस चार्जचा भुर्दंड आयोजकांच्या खिशाला बसणार आहे, अशी व्यथा ‘हॅटस् ऑफ पंचमदा’ या कार्यक्रमाच्या आयोजक स्वरा काटदरे यांनी मांडली. गाण्यांच्या कार्यक्रमात नावाजलेले गायक आणि वादक यांना ऍडव्हान्स पैसे द्यावे लागतात. त्यामुळे आमचे ते नुकसानही होणार आहे. या कलावंतांच्या तारखा रविवारी मिळणे कठीण असते. रवींद्र नाटय़मंदिराकडून आम्हाला दुसरी तारीख दिली जाईल असे सांगण्यात आले असले तरी रविवारी गायक-वादक मिळतील का, असा सवालही स्वरा काटदरे यांनी उपस्थित केला.

– रात्रीच्या प्रयोगाला मध्यंतरानंतर वातानुकूलित यंत्रणा बंद करून कर्मचारी गायब. त्याचा मोबाईल स्विच ऑफ असतो. उकाडय़ातच दुसरा अंक रेटावा लागतो. प्रेक्षक आणि कलावंत दोघेही हैराण.