जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या…

वय वर्षे 90… तरीही पोहोचले अंतराळात

अमेरिकन पंपनी ब्लू ऑरिजीनचे रॉकेट दोन वर्षांनंतर आज अंतराळ यात्रेसाठी उड्डाण केले. याआधी 2021 मध्ये अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस अंतराळ यात्रेवर गेले होते. यावेळी ब्लू ओरिझीनने सहा जणांची निवड केली. यात 90 वर्षे 8 महिने वयाचे अमेरिकेच्या हवाई दलाचे माजी वैज्ञानिक एड ड्वाइट यांचाही सहभाग होता. 2021 मध्ये 90 वर्षीय अभिनेता विलीयम शॅटनर हे अंतराळात झेपावले होते. मात्र, ड्वाईट यांचे वय 90 हून अधिक असल्याने ते अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध यात्री ठरले आहेत. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडल्यानंतर  दहा मिनीटे ते गुरुत्वाकर्षण रहित भागात होते. त्यानंतर सर्व अंतराळवीर पॅप्सुल पॅराशुटच्या मदतीने पृथ्वीवर परतले.

 

देशात 10 घातक औषधांची विक्री

देशात गेल्या सात महिन्यांमध्ये एक नाही दोन नाही तब्बल 10 आरोग्याला घातक अशा औषधांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. डाय- एथिलीन ग्लाइकोल आणि एथिलीन ग्लायकोल यांसारखी आरोग्यासाठी अपायकारक अशी रसायने या औषधांमध्ये असल्याचे उघड झाले आहे. या 10 औषधांपैकी 6 औषधे ही लहान मुलांसाठीची कफ सिरप आहेत. यात कोफवोन एलएस, ग्वाइफेनेसन सिरप-100, ग्वाइफेनेसिन, सिलप्रो प्लस आणि कोल्ड आउट या औषघांचा समावेश आहे. या औषधांमुळे हिंदुस्तान,  गाम्बिया, उज्बेकिस्तान आणि पॅमेरूनसहीत अनेक देशांमध्ये 140 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे.

 

चार राज्यांत उष्णतेची लाट

उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता  हवामान विभागाने वर्तवली आहे. या राज्यांमध्ये पाच दिवस पारा चढलेला असेल तर दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये 23 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहील असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढचे तीन दिवस उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानात दिवस आणि रात्रही उष्ण असेल. रात्रीचे तापमान आरोग्यासाठी धोकादायक असणार आहे. दरम्यान, आज राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तब्बल 46.2, बारमेर 46.9, गंगानगर 46.3 आणि पिलानी येथे 46.3 तापमान होते.

स्लोवाकियाचे पंतप्रधान चिंताजनक

जगात सर्व चुकीच्या किंवा घातक गोष्टींचे मुळ अमेरिका आहे, असे विधान करणाऱया स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गेल्या आठवडय़ात प्राणघातक हल्ला झाला होता. 71 वर्षीय फिको यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. एक गोळी त्यांच्या पोटात लागली होती. जर फिको यांचा मृत्यू झाला तर देशात गृहयुद्ध झेडले जाण्याची भीती आहे.

 

पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

बारामुल्लात उद्या मतदान होत असतानाच दहशतवादी हिंसाचारात वाढ झाली आहे. शनिवारी रात्री एका तासाच्या अवधित झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये पहलगाम टुरिस्ट रिसॉर्टमध्ये जयपूरमधून आलेल्या पर्यटक जोडप्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. जिह्यातील यन्नार भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जयपूर येथील पर्यटक फराहा आणि तबरेज हे जोडपे जखमी झाले. या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

बस पेटून 9 प्रवाशांचा कोळसा

हरयाणातील नूंह येथील पुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास भाविकांनी भरलेल्या चालत्या बसने पेट घेतला. या दुर्घटनेत 9 जण जळून खाक झाले असून, 28 हून अधिक भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. मथुरा-वृंदावनहून परतणाऱया भाविकांच्या या बसमध्ये एकूण 67 जण प्रवास करत होते. एसीमधील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते.

 

कुनो उद्यानातील चित्ता ग्वाल्हेरमध्ये

मध्य प्रदेशच्या शेवपूर जिह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांपैकी ‘वीरा’ ही एक मादी चित्ता भटपंतीत वाट चुकून शेजारच्या ग्वाल्हेर जिह्यात पोहोचली आहे. यामुळे स्थानिक वन कर्मचाऱयांनी ग्वाल्हेर आणि मोरेना जिह्यांमधील जंगलानजीकच्या गावांमधील शेतकऱयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘वीरा’ने ग्वाल्हेरमधील एका गावात एका बकऱयाचीही शिकार केली.

 

काँगोत बंडाचा प्रयत्न फसला

किन्शासा – काँगोमध्ये झालेला बंडाचा प्रयत्न राष्ट्राध्यक्षांशी एकनिष्ठ सैन्याने रविवारी पहाटे हाणून पाडला. येथील स्व-निर्वासित विरोधी पक्षनेते ख्रिश्चन मलंगा यांनी काहीजणांना हाताशी धरून हा बंडाचा प्रयत्न केला होता. लष्करी गणवेशातील काही सशस्त्र पुरुष आणि राष्ट्राध्यक्षांच्या रक्षकांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर अनेक विदेशी लोकांसह काही बंडखोरांना लष्कराने अटक केली.