
ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तब्बल आठ दिवसांनी त्यांना रुग्णालयाने डिस्जार्ज दिला आहे. 92 वर्षीय प्रेम चोप्रा यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना 8 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मारुती सुझुकीने 39,506 गाडय़ा परत मागवल्या
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक पंपनी असलेल्या मारुती सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय ग्रँड विटारा एसयूव्हीच्या 39,506 युनिट्समध्ये तांत्रिक दोष आढळल्यामुळे त्या गाडय़ा परत मागवल्या आहेत. बाजारात दाखल झालेल्या या नवीन एसयूव्हीमध्ये इंधन गेज दाखवणाऱ्या प्रणालीत मोठी त्रुटी आढळल्याचे पंपनीने स्पष्ट केले आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने नियामक फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर 2024 ते 29 एप्रिल 2025 या काळात तयार झालेल्या ग्रँड विटारा एसयूव्हीच्या युनिट्समध्ये ही समस्या आहे. या गाडय़ांमध्ये फ्यूल गेज (इंधनाची पातळी दाखवणारा काटा) नीट काम करत नसल्याची तांत्रिक समस्या आढळली आहे.
अमेरिकेत स्टारबक्सवर बहिष्काराची मागणी
न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी शुक्रवारी स्टारबक्सवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आणि संप करणाऱ्या युनियन बॅरिस्टांना पाठिंबा दिला. जोहरान ममदानी यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘स्टारबक्स कामगार देशभरात संपावर आहेत, ते योग्य करारासाठी लढत आहेत. जोपर्यंत त्यांचा संप होणार नाही, तोपर्यंत मी स्टारबक्समधून अजिबातच खरेदी करणार नाहीये. सर्वांनी साथ द्या, जोपर्यंत करार नाही, तोपर्यंत कॉफी नाही.’ हा संप स्टारबक्सच्या वार्षिक रेड कप डेच्या बरोबरीने झाला. अमेरिकेतील 25 हून अधिक शहरांमधील कामगार संपावर आहेत.
म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचे झटके
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, रविवारी म्यानमारमध्ये रिश्टर 3 तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप 10 किलोमीटरच्या उथळ खोलीवर झाला, ज्यामुळे पुढील झटके येण्याची शक्यता वाढते. लक्षात घ्या की, उथळ भूकंप खोल भूकंपांच्या तुलनेत अधिक धोकादायक असतात. यापूर्वी 14 नोव्हेंबरला 3.9 तीव्रतेचा भूकंप 35 किलोमीटर खोलीवर झाला होता.




























































