कॅनडात हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर गोळय़ा झाडल्या; कारमध्ये सापडला चिरागचा मृतदेह

कॅनडा येथे शुक्रवारी हिंदुस्थानी विद्यार्थ्याची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. चिराग अंतिल असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो हरयाणातून कॅनडा येथे शिक्षणासाठी गेला होता. चिरागच्या हत्येप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

कॅनडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग अंतिल याचा मृतदेह ऑडी कारमध्ये सापडला. व्हँकुव्हर येथील ईस्ट 55 अॅव्हेन्यू रोडवरील लोकांनी गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर पोलिसांना कळवले.  12 एप्रिल रोजी ही घटना घडली. चिरागची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली याचा तपास सुरू आहे. चिरागचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी सरकारला विनंती केली आहे. तसेच क्राऊंड फंडिंग सुरू केले आहे. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तपासावर लक्ष ठेवावे, असे आवाहन नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे प्रमुख वरुण चौधरी यांनी केले आहे.

कोणाशीही वाद नव्हता; नम्र होता

चिराग अंतिल हरयाणातील सोनिपत येथील रहिवाशी आहे. युनिव्हर्सिटी पॅनडा वेस्ट येथून एमबीए पूर्ण केले आहे. चिरागने  वॅनकुवेर येथे सप्टेंबर 2022 मध्ये आल्यावर त्याने वर्क परमिट मिळवले होते. चिरागच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. चिरागचा भाऊ रोमित अनिल म्हणाला, मी आणि माझा भाऊ आम्ही दररोज एकमेकांशी बोलायचो. या घटनेच्या आदल्या दिवशीही आम्ही बोललो. तो खूश होता. त्याचा कुणाशीही वाद नव्हता. खूप नम्र होता.