
तीन वर्षांच्या गॅपनंतर श्रद्धा कपूरचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित झाला असून त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. त्यानिमित्ताने श्रद्धासोबत केलेली बातचीत…
गेली तीन वर्षे तुझ्याकडे काहीच काम नव्हते, अशा परिस्थितीचा सामना तू कसा केलास?
कामाबद्दल मी कधीच इन्सेक्युअर नव्हते. मुळात तुम्ही माझे करिअर बघाल तर तुमच्या लक्षात येईल की, माझे ‘तीन पत्ती’मधून पदार्पण झाल्यानंतर एक वर्षाचे अंतर पडले. त्यानंतर पुन्हा माझ्या दुसऱया सिनेमानंतर माझ्याकडे काम नव्हते. ‘आशिकी 2’ नंतरच मला खऱया अर्थाने काम मिळायला सुरुवात झाली. मला जाणवले की, मला स्वतःशी प्रामाणिक राहायला हवे. मुळात या सगळय़ामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आणि जोमाने काम करायचे बळ मला मिळाले.
तू पडद्यावर खूप आत्मविश्वासाने वावरतेस. हा आत्मविश्वास तुला अभिनेत्री म्हणून समृद्ध करण्यास मदत करतो का?
‘तू झुटी मैं मक्कार’ या सिनेमात माझा रोलच एका कॉन्फिडन्ट मुलीचा आहे. यात मी आत्मविश्वासू दिसतेय याचे कारण म्हणजे मी यापूर्वी साकारलेल्या पात्रांच्या अगदी विरुद्ध असे हे पात्र आहे. या भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल दिग्दर्शक लव रंजन यांचे मी आभार मानते.
सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचा अनुभव कसा होता?
लव रंजन आपल्या सिनेमातून स्वतःचे असे वेगळे जग तयार करतो. माझ्या करियरमध्ये मी पहिल्यांदाच पूर्णपणे दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार काम केले. तो समाधानी होईपर्यंत त्याने मला अनेक रिटेक करायला लावले. लव म्हणायचा की, मी योग्य टाइमपॉज घेतला नाही किंवा एखादा शब्द बरोबर नाही उच्चारला तर त्याचा अर्थ बदलतो. त्याला प्रेक्षकांची नाडी माहीत आहे आणि म्हणूनच लवच्या सूचना योग्य असतात असे मला वाटते. रणबीरबद्दल बोलायचे तर तो खूप हुशार अभिनेता आहे. त्याच्यासोबतही काम करताना खूप मजा आली.


























































